‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका विविध कारणांमुळे प्रेक्षकांची लाडकी झाली. भुवनेश्वरीचा दरारा, अधिपतीचे आईप्रति असलेले प्रेम, अक्षराची कुटुंबाप्रति असलेली आस्था, अधिपती आणि अक्षरा यांच्यामधले दिलखुलास नाते, चारुहास आणि अधिपती यांच्यातील गैरसमज अशा अनेक कारणांमुळे तुला शिकवीन चांगलाच धडा ही मालिका प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांपैकी एक झाली आहे. आता या मालिकेचा नवीन धमाकेदार प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चारुलताचे रूप घेतलेली भुवनेश्वरीच…

झी मराठीने सोशल मीडियावर तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला पाहायला मिळते की, अक्षरा एका अंधाऱ्या खोलीत आहे. तिथे तिला जोकरचा चेहरा दिसत आहे. घाबरलेली अक्षरा विचारते की, कोण आहात तुम्ही? तेव्हा जोकरच्या मास्कमागून एक चेहरा बाहेर येतो. हा चेहरा चारुलताचा आहे आणि ती म्हणते की, अक्षरा, विश्वास ठेव- मी चारुलता आहे. लगेच दुसऱ्या बाजूने भुवनेश्वरी येते आणि म्हणते की, चारुलताचे रूप घेतलेल्या आम्हीच आहोत, भुवनेश्वरी सूर्यवंशी. त्यानंतर चारुलता म्हणते की, मी खरंच चारुलता आहे. त्यानंतर भुवनेश्वरी, चारुलता या दोन्ही व्यक्तिमत्त्वांची ते रूप म्हणजे आपणच आहोत, हे पटवून देण्याची चढाओढ लागली आहे. हे सर्व पाहून अक्षरा गोंधळल्याचे दिसत आहे. त्यानंतर ती म्हणते, “बास, मला त्रास होतोय. चारुलता आणि भुवनेश्वरीचं सत्य मी शोधणार.”

झी मराठी इन्स्टाग्राम

झी मराठी वाहिनीने हा प्रोमो शेअर करताना, ‘अक्षरा शोधणार चारुलता आणि भुवनेश्वरीचं सत्य…?’, अशी कॅप्शन दिली आहे.

मालिकेत दाखविल्याप्रमाणे, चारुलता ही अधिपतीची खरी आई आहे; मात्र एका अपघातात तिचे निधन झाले आहे, असा घरच्यांचा समज होतो. त्यावेळी अधिपतीचे वय लहान असते. त्याला रस्त्यावर एक बाई दिसते, जी हुबेहूब चारुलतासारखी दिसत असते. अधिपती तिला आई म्हणतो आणि त्याच्या हट्टासाठी त्याचे वडील त्या बाईला घरी घेऊन येतात. तिचे नाव भुवनेश्वरी, असे आहे; जी शिक्षणाचा तिरस्कार करते. ती अधिपतीला आईचे प्रेम देते आणि हळूहळू घराची सर्व सूत्रे स्वत:च्या हातात घेते. या सगळ्यातून अधिपतीच्या मनात वडिलांविषयी गैरसमज निर्माण होतो. भुवनेश्वरी आणि चारुहास यांच्या नात्यामध्ये कटुता निर्माण होते.

हेही वाचा: Bigg Boss 18: अखेर विवियन डिसेना आणि करणवीर मेहरामध्ये पडली वादाची ठिणगी, करण म्हणाला, “एक नंबरचा मुर्ख माणूस”

अधिपती आणि अक्षरा घरात नसताना भुवनेश्वरी आणि चारुहास यांच्यामध्ये मोठे भांडण होते आणि त्यातूनच चारुहास भुवनेश्वरीला घराबाहेर काढतो. त्यानंतर काही दिवसांत चारुलता त्यांच्या आयुष्यात येते. ती भुवनेश्वरीच्या अगदी विरुद्ध आहे. अधिपती तिला आई मानण्यास तयार होत नाही. तो सतत भुवनेश्वरीचा शोध घेत असल्याचे दिसते.

आता मालिकेत पुढे काय होणार, भुवनेश्वरी आणि चारुलता यांचं सत्य काय आहे, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tula shikvin changlach dhada marathi serial new twist what is the truth about charulata and bhuvaneshvari watch promo nsp