छोट्या पडदयावरील मालिका या आजही अनेक प्रेक्षकांच्या मनाचा हळवा कोपरा आहेत. मालिकेची कथा, कलाकारांचा अभिनय यासह मालिकेत रोज येणारे नवनवीन ट्विस्ट याबद्दल चाहत्यांना कायमच उत्सुकता लागून राहिलेली असते. अशाच काही लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे झी मराठीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ (Tula Shikvin Changlach Dhada) ही मालिका. मालिकेतील नवनवीन ट्विस्ट्समुळे ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका बनली आहे. अक्षरा-अधिपतीच्या जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत.

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेतील अक्षरा व अधिपती यांच्या नात्यात गेल्या काही दिवसांपासून दुरावा आल्याचे पाहायला मिळत आहे. भुवनेश्वरीच्या कट कारस्थानांमुळे ते दोघे एकमेकांपासून दूर गेल्याचे पाहायला मिळत आहे. अक्षराने भुवनेश्वरीचे सत्य समोर आणत चारूहासबरोबरचे लग्न मोडले होते. त्याचाच बदला म्हणून भुवनेश्वरीने अधिपती-अक्षरा यांचे लग्न मोडण्याचा निश्चय केला आहे, त्यासाठी ती अनेक प्लॅन्स करताना दिसते.

अक्षराने काही दिवसांपुर्वीच घर सोडून घेण्याचा निर्णय घेतला. यानंतर तिला घरात पुन्हा आणण्यासाठी अधिपती-चारूहास यांनी अनेक प्रयत्न केले. पण या प्रयत्नांना यश मिळाले नाही. अशातच आता चारूहास स्वत: तिला घरात आणण्यासाठी गेला आहे. मालिकेच्या या आगामी कथानकाचा प्रोमो नुकताच शेअर करण्यात आला आहे. झी मराठीच्या अधिकृत सोशल मिडिया अकाऊंटद्वारे या नवीन कथानकाचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे.

या नवीन प्रोमोमध्ये आजी अधिपतीला सांगतात की, “तुझे बाबा अक्षराबरोबर बोलण्यासाठी तिच्या घरी गेले आहेत”. यानंतर दुर्गेश्वरीला भुवनेश्वरीला अक्षरा घरात येणार असल्याचे सांगते. यावर भुवनेश्वरी तिला असं म्हणते की, “या घरात आमच्या परवानगीशिवाय वारंही येत नाही”. यावर दुर्गेश्वरी पुन्हा तिला “तरीही मोठ्या साहेबांनी अक्षराला हाताला धरून या घरात आणलं तर?” असा प्रश्न विचारते. यावर भुवनेश्वरी असं म्हणते की, “त्याच हाताला धरून आम्ही तिला घराबाहेर काढू.”

त्यामुळे एकीकडे चारूहास सुनेला घरी आणण्यासाठी आणि तिचा व अधिपतीचा संसार सुखाने होण्यासाथी प्रयत्न करताना दिसत आहे. तर दुसरीकडे भुवनेश्वरी त्यांच्या प्रत्येक प्रयत्नांमध्ये अपयश आणताना दिसत आहे. त्यामुळे आता अखेर अक्षरा घरी येणार का? की भुवनेश्वरी पुन्हा काहीतरी नवीन् खेळी खेळून अक्षराला पुन्हा घरात आणण्यावाचून अडवणार? हे आगामी भागातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.