अक्षरा व अधिपती ही गाजलेली पात्रे आहेत. सुशिक्षित असलेल्या शाळेत शिक्षिकेची नोकरी करणाऱ्या अक्षरा व अशिक्षित अधिपतीचे लग्न होते. काळ पुढे सरकतो तसे ते एकमेकांच्या प्रेमात पडतात. त्यांच्यातील वेगळेपणामुळे ही पात्रे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणाऱ्या ‘तुला शिकवीन चांगलाच धडा'(Tula Shikvin Changlach Dhada)मधील ही पात्रे सातत्याने लक्ष वेधून घेतात. काही दिवसांपासून या मालिकेत सातत्याने ट्विस्ट येताना दिसत आहेत.
मालिकेत दाखविल्याप्रमाणे, गेल्या काही दिवसांपासून अधिपती व अक्षरा यांच्यामध्ये दुरावा आला असल्याचे पाहायला मिळत आहे. भुवनेश्वरी खोटे वागत असल्याचे समोर आल्यानंतर अक्षराने भुवनेश्वरीविरुद्ध बोलायला सुरुवात केली होती. त्यानंतर भुवनेश्वरीने अक्षरा व अधिपती यांच्यात दुरावा निर्माण व्हावा यासाठी अनेक कट कारस्थान केल्याचे पाहायला मिळाले. भुवनेश्वरी ही अधिपतीची खरी आई नसल्याने मी सासू मानणार नाही, असे अक्षराने स्पष्ट सांगितले. मात्र, अधिपतीच्या आयुष्यात भुवनेश्वरीचे सर्वोच्च स्थान आहे, त्यामुळे अधिपती व अक्षरा यांच्यामध्ये गैरसमज निर्माण झाले. या सगळ्यात अक्षराने घर सोडले व ती तिच्या माहेरी येऊन राहिली. त्यानंतर मात्र त्यांना एकमेकांच्या प्रेमाची जाणीव झाली. एकमेकांतील गैरसमज दूर करण्यासाठी त्यांनी अनेकदा भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र, भुवनेश्वरी-दुर्गेश्वरी यांच्या कट कारस्थानामुळे ते एकमेकांना खूप दिवस भेटू शकले नाही. पण, जेव्हा भेटले तेव्हा त्यांच्यातील गैरसमज दूर होऊ शकले नाहीत. आता या मालिकेचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे.
झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर तुला शिकवीन चांगलाच धडा मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, अक्षराची आई तिला समजावत म्हणते, “भुवनेश्वरी मॅडमचा आई म्हणून स्वीकार केलाच असेल तर तुला त्यांचा स्वीकार करावाच लागणार आहे, जा तू तुझ्या सासरी.” दुसरीकडे अक्षराचा मित्र तिच्या बाबांना समजावत सांगतो, “काहीही झालं तरी अक्षराला पुन्हा त्या अडाणी माणसाच्या घरी पाठवू नका.” हा प्रोमो शेअर करताना, “अक्षराचे वडील अक्षराला सासरी पाठवतील का?”, अशी कॅप्शन दिली आहे.
आता अक्षरा आईचा सल्ला ऐकून अधिपतीच्या घरी परतणार का, अधपती व अक्षरा यांच्यातील गैरसमज दूर होणार का, भुवनेश्वरी आणखी काय करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अधपती व अक्षराला पुन्हा एकदा एकत्र पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.