‘तुला शिकवीन चांगलाच धडा'(Tula Shikvin Changlach Dhada) या मालिकेतील अक्षरा व अधिपती यांच्या नात्यात दुरावा आल्याचे पाहायला मिळत आहे. अधिपती व अक्षरा यांना एकमेकांविषयी प्रेम वाटते, आपुलकी वाटते तसेच एकमेकांची काळजीही वाटते. मात्र, भुवनेश्वरीच्या कट कारस्थानांमुळे ते दोघे एकमेकांपासून दूर गेल्याचे पाहायला मिळत आहे. भुवनेश्वरीने त्यांच्यामध्ये मोठे गैरसमज निर्माण केले होते. अक्षराने भुवनेश्वरीचे सत्य समोर आणत चारूहासबरोबरचे लग्न मोडले होते. त्याचा बदला म्हणून भुवनेश्वरीने अधिपती व अक्षरा यांचे लग्न मोडण्याचा निर्धार केला आहे, त्यासाठी ती विविध योजना करताना दिसते.
जेव्हा अक्षरा व अधिपती यांचे लग्न झाले, तेव्हा अक्षरा अधिपतीच्या प्रेमात पडली नव्हती. मात्र, हळूहळू ते एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसत होती. आता मात्र त्यांच्यात गैरसमज निर्माण झाले आहेत. अक्षरा काही दिवसांपूर्वी अधिपतीचे घर सोडून तिच्या माहेरी राहण्यासाठी गेली. तिथे गेल्यानंतर ती आई होणार असल्याची बातमी तिला समजली. हीच गोष्ट तिला अधिपतीला भेटून सांगायची होती, त्यासाठी तिने अधिपतीला अनेकदा भेटून हे सांगायचे ठरवले. काही वेळा त्यांची भेट झालीसुद्धा, मात्र ते एकमेकांना त्यांच्या मनातील गोष्टी सांगू शकले नाहीत. अधिपतीनेदेखील अक्षराला भेटून त्याच्या मनातील अक्षराविषयीचे प्रेम व्यक्त करण्याचा अनेकदा निर्धार केला, मात्र भुवनेश्वरी व दुर्गेश्वरीच्या कट कारस्थानांमुळे ते शक्य झाले नाही.
मी माझा संसार…
आता भुवनेश्वरीने अक्षरा-अधिपतीमध्ये कायमचा दुरावा आणण्याचा मोठा कट रचला आहे. तिने अक्षरा व अधिपतीला घटस्फोटाचे पेपर पाठवले आहेत. अक्षराला वाटत आहे की, अधिपतीने हे घटस्फोटाचे पेपर पाठवले आहेत आणि अधिपतीचा असा समज झाला आहे की अक्षराने हे पेपर पाठवले आहेत. आता या मालिकेचा प्रोमो समोर आला आहे.
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’च्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे की, घटस्फोटाचे पेपर पाहिल्यानंतर अक्षरा व अधिपती दोघेही दुखावले गेले आहेत. मात्र, तरीही अक्षराला अजूनही तिचा संसार वाचेल, टिकेल अशी आशा वाटत आहे. ती तिच्या आईबरोबर बोलताना म्हणते की, अधिपतींबरोबर बोलल्याशिवाय मी कोणताही निर्णय घेणार नाही. मी माझा संसार परत मिळवीन; तर दुसरीकडे अधिपती असे म्हणत आहे की, “त्यांना वेगळं व्हायचं आहे ना माझ्यापासून, ठीक आहे; त्यांना जे पाहिजे ते मी देऊन टाकतो.” याच प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की भुवनेश्वरी चारूहासला म्हणते, “तुमच्या सुनेला उद्ध्वस्त करणार, जशास तसं.” हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “संसार परत मिळवण्याचा अक्षराचा निर्णय”, अशी कॅप्शन दिली आहे.
आता अक्षरा तिचा संसार वाचविण्यासाठी काय करणार, अधिपतीच्या मनातील तिच्याविषयीचे गैरसमज कसे दूर करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.