सुशिक्षित, स्वतंत्र विचार व मते असलेली अक्षरा व अशिक्षित पण प्रेमळ अधिपती या दोन पात्रांनी गेल्या काही काळापासून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा'(Tula Shikvin Changlach Dhada) या मालिकेतील ही दोन पात्रे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना दिसतात. अक्षरा व अधिपती यांच्यामध्ये अनेक बाबतीत भिन्नता आहे. मात्र, तरीही ते एकमेकांवर प्रेम करतात, असे मालिकेत पाहायला मिळते. आता मात्र भुवनेश्वरीमुळे त्यांच्यात दुरावा आला आहे. भुवनेश्वरीमुळे अक्षराने अधिपतीचे घर सोडले आहे. सध्या ती तिच्या माहेरी राहत असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, अधपती व अक्षरा हे एकमेकांना भेटण्यासाठी सतत प्रयत्न करताना दिसत आहे. आता या मालिकेचा नवीन प्रोमो पाहिल्यानंतर त्यांची भेट होऊ शकणार का, असा प्रश्न पडत आहे.
सूनबाई जर परत आल्या…
तुला शिकवीन चांगलाच धडा मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोच्या सुरुवातीला अक्षरा स्वत:शीच म्हणते, “फार वेळ मी ही बातमी होल्ड करू शकणार नाही, उद्या सांगणारच तुम्हाला.” यावेळी ती भावूक झाल्याचे दिसत आहे. दुसरीकडे भुवनेश्वरी तिच्या बहिणीला म्हणते, “सूनबाई जर परत आल्या, संक्रांत घरात नाही, घरावर येईल आणि आम्ही तसं होऊ देणार नाही”, असे म्हणत भुवनेश्वरीने अक्षराला परत घरात न येऊ देण्याचा निर्धार केल्याचे पाहायला मिळत आहे. हा प्रोमो शेअर करताना भुवनेश्वरी काय नवा डाव खेळणार? अशी कॅप्शन दिली आहे.
तुला शिकवीन चांगलाच धडा मालिकेत दाखविल्याप्रमाणे भुवनेश्वरीने चारूहासबरोबर लग्न करण्यासाठी चारूलताचे रूप घेतले होते. तिचा हा प्लॅन यशस्वी होत असतानाच अक्षराला तिच्या या प्लॅनबद्दल समजले. चारूहास व भुवनेश्वरीच्या लग्नादिवशीच अक्षराने तिचे सत्य सर्वांसमोर आणले. या सगळ्यात अधिपती व अक्षरा यांच्यामध्ये मोठे गैरसमज निर्माण झाले. जेव्हा अक्षराने घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी अधिपतीने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. माहेरी गेल्यानंतर अक्षराला ती आई होणार असल्याचे समजले. आता तिला ही बातमी अधिपतीला भेटून सांगायची आहे. संक्रांतीला अधिपतीला भेटायचे व त्याला ही बातमी सांगायची, असे तिने ठरवले आहे. अधिपतीलादेखील अक्षराला भेटायचे आहे. दोघेही एकमेकांना भेटण्यासाठी उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे. याआधीही त्यांनी एकमेकांना भेटण्याचे अनेक प्रयत्न केले होते. मात्र, प्रत्येकवेळी भुवनेश्वरीने त्यांनी भेटू नये, यासाठी अनेक गोष्टी केल्याचे पाहायला मिळत आहे.
आता अक्षरा घरात येऊ नये म्हणून भुवनेश्वरी नेमकं काय करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
© IE Online Media Services (P) Ltd