सूर्या व तुळजा ही पात्रे त्यांच्या साधेपणा व प्रेमळ स्वभावामुळे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना दिसतात. झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणारी ‘लाखात एक आमचा दादा’ (Lakhat Ek Aamcha Dada) ही प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकेपैकी एक आहे. काही दिवसांपूर्वीच तुळजाने सूर्याविषयीच्या तिच्या भावना व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले. याचबरोबर ती सूर्याच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची काळजी घेतानादेखील दिसते. आता ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेत मोठा ट्विस्ट येणार असल्याचे झी मराठी वाहिनीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये दिसत आहे.

तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार

‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेचा प्रोमो झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या प्रोमोच्या सुरुवातीला पाहायला मिळते की, जागरणाचा कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमात सर्व जण आनंदाने सहभागी झाल्याचे दिसत आहे. हा कार्यक्रम सुरू असतानाच तुळजा सूर्याला म्हणते, “सूर्या माझ्याबरोबर आत येशील?” सूर्या तिच्याबरोबर घराच्या आत जातो. तिथे गेल्यानंतर तुळजा सूर्याला म्हणते, “तू इथे बस, मी आलेच.” तुळजा दुसऱ्या खोलीत जाते. एका तिजोरीतून कागदपत्रांची फाइल हातात घेत आनंदाने बाहेर येते. मात्र, बाहेर आल्यानंतर तुळजाला सूर्या दिसत नाही. ती सूर्या अशी हाक मारते, तोपर्यंत तिचे वडील म्हणजेच डॅडी तिथे येतात. डॅडी तिला म्हणतात, “काय शोधतंय आमचं कन्यारत्न?” सुरुवातीला तुळजा हातातील कागदपत्रे लपवण्याचा प्रयत्न करते. डॅडी पुढे म्हणतात, “जमिनीचे कागद दाखवून आमचाच नंदीबैल आमच्यावर सोडता की काय?” त्यावर तुळजा वडिलांना उत्तर देत म्हणते, “हो, त्यालाही कळलं पाहिजे की हा देवाचा मुखवटा घातलेले तुम्ही राक्षस आहात. तुमचा चेहरा सूर्यासमोर आणणार, कारण मी आता तुळजा सूर्यकांत जगताप आहे.”

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “बाप लेक एकमेकांसमोर उभे ठाकणार…!”, अशी कॅप्शन दिली आहे.

लाखात एक आमचा दादा मालिकेतील सूर्या तुळजाच्या वडिलांना म्हणजेच डॅडींना देवासारखे मानतो. ते म्हणतील ती पूर्वदिशा इतका त्याचा त्यांच्यावर विश्वास आहे. डॅडी जे म्हणतील ते करण्यासाठी तो तयार होतो, कारण त्याला वाटते डॅडी हे देवमाणूस आहेत. मात्र, डॅडी त्याचा स्वत:च्या कामासाठी फायदा करून घेतात. ज्यावेळी शिवा तिच्या आजीबरोबर जमीन परत मिळवण्यासाठी सूर्याच्या गावाला आली होती, त्यावेळी शिवा व तुळजा या जमिनीची कागदपत्रे शोधण्यासाठी डॅडींच्या बंगल्यात गेल्या होत्या. त्याचवेळी तुळजाच्या हाती काही कागदपत्रे लागली होती, ज्यामध्ये सूर्या कोट्यवधी संपत्तीचा मालक असल्याचे तिला समजले होते.

हेही वाचा: सोनाक्षी सिन्हाने गरोदर असल्याच्या अफवांवर दिली प्रतिक्रिया; म्हणाली, “लोक वेडे…”

आता तुळजाला डॅडींचे सत्य समजले आहे हे कळल्यानंतर ते पुढे काय करणार, तुळजा सूर्याला हे सत्य सांगू शकणार का, शत्रू तेजूला चांगली वागणूक देणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Story img Loader