टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने मालिकेच्या सेटवर गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर सर्वांनाच जबरदस्त धक्का बसला. तुनिषा शर्माच्या आत्महत्येनंतर तिची आई वनिता शर्मा यांनी तिचा बॉयफ्रेंड आणि मालिकेतील सह-कलाकार शिझान खानवर अनेक आरोप केले. त्यानंतर शिझान खानला पोलिसांनी ताब्यात घेतलं. सध्या तो पोलीस कोठडीत असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. तुनिषाच्या आत्महत्येनंतर अभिनेता शिवीन नारंग याने विविध खुलासे केले आहेत.
तुनिषा शर्माने २४ डिसेंबरला ‘अलीबाबा दास्तान ए काबुल’ या मालिकेच्या सेटवर गळफास घेत जीवन संपवलं. तिच्या आत्महत्येच्या तीन दिवसांनी म्हणजेच २७ डिसेंबरला तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तुनिषाच्या आत्महत्येमुळे तिच्या कुटुंबियांसह मित्र-मैत्रिणींनाही धक्का बसला. या प्रकरणानंतर नुकतंच तिचा मित्र आणि सहकलाकार शिवीन नारंग याने भावूक प्रतिक्रिया दिली. “तुनिषाने ज्या दिवशी आत्महत्या केली त्याच दिवशी आम्ही दोघेही एका म्युझिक व्हिडीओचे शूटींग करणार होतो”, असे तो म्हणाला. ई-टाईम्सशी बोलताना त्यानेही प्रतिक्रिया दिली.
आणखी वाचा : तुनिषा शर्माच्या मृत्यू नेमका कशामुळे झाला? कारण आले समोर
शिवीन नारंग काय म्हणाला?
“तुनिषाने आत्महत्या केलीय यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही. तुनिषा आणि मी २३ आणि २४ डिसेंबर या दोन्हीही दिवस एका म्युझिक व्हिडीओच्या शूटसाठी भेटणार होतो. याचे शूटींग मुंबईत होणार होते. आम्ही दोघेही फार वर्षांनी एकत्र भेटणार असल्याने मी फार आनंदात होतो. विशेष म्हणजे यानिमित्ताने अनेक दिवसांनी आम्ही एकत्र काम करणार होतो. ज्या दिवशी तुनिषाने आत्महत्या केली तेव्हा जर आम्ही भेटलो असतो तर…!
पण आठवडाभर आधी तिने तिची तब्येत ठिक नसल्याचे सांगितले आणि त्यामुळे ते शूटींग पुढे ढकलण्यात आले. जर आम्ही त्याच दिवशी भेटलो असतो तर कदाचित मला तिची मनस्थिती समजली असती आणि मी तिला मदत करु शकलो असतो. आमच्या दोघांची मैत्री ही व्यवसायिक आणि वैयक्तिरित्या फार चांगली होती.
आम्ही काम केले तेव्हा ती फक्त १६ वर्षांची होती. पण ती फारच अत्यंत व्यावसायिक होती. ती तिच्या कामात अत्यंत चोख होती. ती सेटवर फार मजा-मस्ती करायची. आम्ही फार गमती-जमती करायचो. आम्ही सेटवर असताना अनेकदा एकत्र जेवण करायचो. मी तिच्या आईलाही ओळखायचो. आम्ही मालिका संपल्यानंतरही एकमेकांच्या संपर्कात असायचो. इतकंच नव्हे तर मी या वर्षाच्या सुरुवातीला त्यांच्याही गावीही जाऊन आलो होतो. त्यांनी मला जेवायला बोलवलं होतं. आम्ही दोघेही शेवटचे एका सोहळ्यादरम्यान भेटलो होतो. तेव्हा ती फारच आनंदात होती. त्यावेळी आम्ही एकत्र डान्सही केला होता. पण आता ती आपल्यात नाही, यावर मला विश्वासच बसत नाही”, असेही शिवीनने म्हटले.
आणखी वाचा : तुनिषा शर्माच्या आत्महत्येनंतर चर्चेत आलेला शिझान खान नेमका आहे तरी कोण? जाणून घ्या
दरम्यान शिवीन नारंग आणि तुनिषा शर्मा हे दोघेही एकमेकांचे चांगले मित्र आहे. त्या दोघांनी इंटरनेट वाला लव्ह या मालिकेत काम केले होते. यात ती मुख्य भूमिकेत झळकली होती. तुनिषा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री होती. तिने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘अलिबाबा: दास्तान ए कबूल’ मालिकेत ती मुख्य भूमिका साकारत होती. या मालिकेच्या सेटवरच तिने मेकअप रुममध्ये गळफास घेत आत्महत्या केली. तुनिषाने मालिकांबरोबरच चित्रपटांतही काम केलं आहे. तिच्या जाण्याने मालिकाविश्वात हळहळ व्यक्त होत आहे.