प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने २४ डिसेंबरला गळफास घेत आत्महत्या केली. २७ डिसेंबरला तिच्यावर मीरा रोड येथील स्मशानभूमीत अत्यसंस्कार करण्यात आले. यावेळचा तुनिषाच्या आईचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात त्या बेशुद्ध झालेल्या दिसत आहेत. पण त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे प्रसिद्ध अभिनेत्रीने संताप व्यक्त केला आहे. या अभिनेत्री रीम शेखने सोशल मीडियावर संतप्त पोस्ट शेअर केली आहे.
तुनिषाच्या अंत्ययात्रेचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यातील एका व्हिडीओमध्ये रीम शेख आणि अवनीत कौर फोटोग्राफर्सनादूर राहण्यासाठी आणि सहकार्य करण्यासाठी सांगताना दिसल्या होत्या. पण तरीही त्यांचं कोणीही ऐकलं नाही. त्यानंतर आता रीम शेखने इन्स्टाग्राम स्टोरीवर लांबलचक पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे. “जेव्हा हे पापराझी सर्वांना, ‘तुम्हाला कसं वाटतंय?’ किंवा ‘तुमच्या काय भावना आहेत?’ असं विचारताना दिसत होते तेव्हा माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली होती.” असं तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
रीम शेखने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं, “आज आपण एक हास्य गमावलं, आयुष्यात आनंदी असणारी व्यक्ती गमावली. ती आम्हाला खूप लवकर सोडून गेली. तिचं अशाप्रकारे जाणं खूप दुःखद होतं. एक कलाकार म्हणून आमचं आयुष्य एखाद्या उघड्या पुस्तकाप्रमाणे असतं. मीडिया आमच्या सुख-दुःखात नेहमीच सहभागी असतं यासाठी आम्ही नेहमीच आभारी आहोत. पण एक माणूस म्हणून आम्हालाही आमचं खासगी आयुष्य आहे. खासकरून जेव्हा आम्ही आमच्या जवळच्या व्यक्तीला गमावल्यानंतर तुमचं सहकार्य अपेक्षित असतं.
“तुनिषाची आईही मीडियाची आभारी होती मात्र आता मीडियाच्या या वागण्यामुळे त्या दुःखी झाल्या आहेत. त्यांनी आपली एकुलती एक मुलगी गमावली आहे. पण त्यांचं दुःख आणि असहाय्यता कॅमेऱ्यात टिपली जात होती. हे सर्व पाहून माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली होती. अंत्यसंस्कारांच्या वेळी आम्हाला आमचे विचार आणि भावना काय आहेत असं विचारलं जात होतं. हे अतिशय संतापजनक होतं.” असंही तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
रीम शेखने पुढे लिहिलं, “मी समजू शकते की, बातमी कव्हर करणं आणि त्याचे अपडेट वेळोवेळी देणं गरजेचं आहे. पण एका तरुण व्यक्तीला गमावण्याचं दुःख शब्दात व्यक्त केलं जाऊ शकत नाही. शोकसभेच्या वेळी व्यक्तीच्या खासगी आयुष्याचा विचार केला गेला पाहिजे. प्रत्येकाची पर्सनल स्पेस असते आणि मीडियाने याची काळजी घ्यायला हवी. कृपया त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचा आदर करा. सद्य परिस्थितीबद्दल थोडी संवेदना दाखवा.”