काल मनोरंजन क्षेत्रातून एक धक्कादायक बातमी समोर आली. छोट्या पडद्यावरील अभिनेत्री तुनिषा शर्माने शनिवारी (२४ डिसेंबर) दुपारी मालिकेच्या सेटवरच गळफास घेत आत्महत्या केली. यानंतर एकच खळबळ उडाली. ती सोनी सब टीव्हीवरील ‘अलिबाबा: दास्तान ए काबुल’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारत होती. तिच्या आत्महत्येविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. आता पोलिसांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
तुनिषाचा मृतदेह रात्री उशिरा मुंबईतील जे जे रुग्णालयात शवविच्छेदनसाठी आणण्यात आला होता. ४ ते ५ डॉक्टर तिच्या शवविच्छेदनच्या वेळी उपस्थित होते. या शवविच्छेदनाची व्हिडिओग्राफी तयार करण्यात आली आहे. तिचं शव हे रुग्णालयातच ठेवण्यात आले आहे. माध्यमांच्या माहितीनुसार ११ पर्यंत शवविच्छेदनाचा अहवाल समोर येईल आणि तिचे शव हे कुटुंबियांना देण्यात येईल. तिचे शव मीरा रोड येथे नेण्यात येईल आणि संध्याकाळी ४, ४.३० च्या आसपास तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
मीरा रोड येथे राहणार्या तुनिषाचे अभिनेता मोहम्मद शिझान याच्यासोबत प्रेमसंबंध होते. मात्र त्याने प्रेमसंबंध तोडल्याने ती निराश झाली होती. दोन दिवसांपासून ती नैराश्यात होती अशी तक्रार तुनिषाच्या आईने दिली होती. त्या तक्रारीवरून आम्ही शिझानच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून रात्री उशिरा अटक केली, अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत जाधव यांनी दिली.