टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने मालिकेच्या सेटवर गळफास घेऊन आत्महत्या केली. आज तिच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. शनिवारी २४ डिसेंबर रोजी ही घटना घडली. तुनिषा शर्माच्या आत्महत्येप्रकरणी आई वनिता शर्मांनी तिचा बॉयफ्रेंड आणि मालिकेतील सह-कलाकार शिझान खानविरोधात तक्रार दिली आहे. सध्या शिझान हा पोलीस कोठडीत आहे. या प्रकरणी पोलिस शिझानची कसून चौकशी करत आहेत. मात्र नुकतंच याबद्दल एक खुलासा झाला आहे.
टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्या केल्याने मनोरंजन क्षेत्राला पुन्हा एकदा धक्का बसला. तुनिषाच्या आत्महत्येनंतर सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी तुनिषाचा बॉयफ्रेंड आणि सहकलाकार शिझान खानवर गंभीर आरोप करण्यात आले आहे. शिझानला अटक करून रविवारी कोर्टासमोर हजर केलं, त्यानंतर त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिझान खान हा सातत्याने दिलेले जबाब बदलत आहे. त्याने आतापर्यंत तुनिषाबरोबर ब्रेकअप का झाला याबद्दलचे खरे कारण सांगितलेले नाही.
आणखी वाचा : तुनिषा शर्माच्या मृत्यू नेमका कशामुळे झाला? कारण आले समोर
एएनआयने पोलिसांच्या सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, “शिझान खान हा गेल्या दोन दिवसांपासून पोलीस कोठडीत आहे. आम्ही त्याची सातत्याने चौकशी करत आहोत. सलग दोन दिवस त्याची चौकशी करण्यात आली असता त्याने तुनिषाबरोबर ब्रेकअप कसा झाला, त्यावेळी काय घडलं याबद्दलच्या विविध गोष्टींचा खुलासा केला. त्यानंतर जेव्हा शिझानची चौकशी एका महिला पोलीस अधिकाऱ्याने केली, त्यावेळी तो फार रडला होता. मात्र यावेळी त्याने त्याच्या आयुष्यात इतर मुलगी असण्याचा आरोप फेटाळून लावला आहे.”
“शिझान खान हा तपास जलदगतीने सुरु आहे. आतापर्यंत या प्रकरणाशी संबंधित १७ जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. शिझान आपले विधान वारंवार बदलत आहे. तो एक अभिनेता असल्याने त्याच्या चेहऱ्यावरील दु:ख अभिनय स्वरुपातील आहे की नाही, याचाही पोलीस तपास करत आहे.”
तुनिषा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री होती. तिने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘अलिबाबा: दास्तान ए कबूल’ मालिकेत ती मुख्य भूमिका साकारत होती. या मालिकेच्या सेटवरच तिने मेकअप रुममध्ये गळफास घेत आत्महत्या केली. तुनिषाने मालिकांबरोबरच चित्रपटांतही काम केलं आहे. तिच्या जाण्याने मालिकाविश्वात हळहळ व्यक्त होत आहे.