अभिनेत्री तेजस्विनी लोणारी हिने आपल्या अभिनयाने मराठी मनोरंजनसृष्टीत एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ‘दोघांत तिसरा आता सगळं विसरा’, ‘गुलदस्ता’ यांसारख्या चित्रपटात ती झळकली आहे. तसेच अलीकडेच तिचा ‘अफलातून’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. खरंतर तेजस्विनी बिग बॉस मराठीमुळे अधिक प्रसिद्धीच्या झोतात आली. त्यानंतर ती मालिका आणि चित्रपटांमध्ये पाहायला मिळाली. सध्या ती ‘तुझेच मी गीत गात आहे’ या लोकप्रिय मालिकेत दिसत आहे. अलीकडेच तेजस्विनीनं एका मुलाखतीमधून तिला स्वामी समर्थांची कशी प्रचिती आली याबाबत सांगितलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – “…तर तुम्ही भिकेला लागाल”; ‘श्वास’ फेम अभिनेते अरुण नलावडे यांना असं कोण म्हणालं होतं?

‘इसापतीनी एंटरटेन्मेंट’ या युट्यूब चॅनेलवरील छापा काटा या कार्यक्रमात तेजस्विनी लोणारी सहभागी झाली होती. त्यावेळेस तिला विचारलं गेलं की, ‘तू एक स्वामी भक्त आहेस. या अस्थिर असलेल्या क्षेत्रात जी आध्यात्मिक ताकद लागते ती तुला किती उपयोग पडते? स्वामींबाबत तुला किती प्रचिती आल्या आहेत?

हेही वाचा – ‘सहकुटुंब सहपरिवार’ फेम अभिनेत्री नंदिता पाटकरनं चाहत्यांना दिली आनंदाची बातमी; व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “एक सिक्रेट…”

यावर तेजस्विनी म्हणाली की, “खूपदा आली आहे. खरंतर मी आता दीडवर्ष सलग काम करतेय. त्या आधी मी सात वर्ष काहीच करत नव्हते. एकूण बघायला गेलं तर १४ वर्ष माझं अयशस्वी करिअर होतं. मी १६ वर्षांची असताना करिअरला सुरुवात केली होती. माझा पहिला चित्रपट केदार शिंदेंचे भाऊ मंदार शिंदे यांचा ‘नो प्रोब्लेम’ होता. तेव्हा नुकतीच दहावी झाली होती. अतुल सिधाये यांच्याकडे फोटोशूट करायचे, त्यांनी मला हे सूचवलं होतं. पहिल्याचं चित्रपटात जितेंद्र जोशीची हिरोइन करायला मिळालं होतं. किशोर नमित कपूर अभिनय संस्थेतून मी अभिनयाचे धडे घेतले होते. तिथे नेहमी सांगायचे, पहिली संधी चांगली मिळते, पण ते टिकवून ठेवणं खूप कठीण आहे. मला हे नंतर कळालं. पहिला चित्रपट मस्त मिळाला. बाकी पुढचं काय? जे मिळतं होतं, ते चालतं नव्हतं. त्यातला ‘दोघांत तिसरा आता सगळं विसरा’ हा चित्रपट प्रचंड चालला. आताही लोकं मिस चित्रा म्हणतात. पण एक चित्रपट खूप चालायचा अन् पुढे काहीच मिळतं नव्हतं, असं झालं होतं. माझ्याबाबतीत हे खूपदा झालं. नितीन देसाईंची पद्मनी खूप चालली. मग परत नंतर काहीच नाही. बऱ्याचदा प्रोजेक्टच्या ज्या मिटींग जायचे त्या व्यक्तीचं कोणीतरी जायचं, असं व्हायचं. मला आई एकदा म्हणाली की, तू काय लोकांना मुक्ती वगैरे द्यायला जातेस का? मी जिथे जायचे तिथे मला फोनवरून सांगितलं जायचं, अरे अमुक-तमुकचं कोणीतरी गेलंय. हे सगळं खरच बोलतं असतील असं आता आपण गृहीत धरूया. ती वेळ आली नव्हती. जेव्हा वेळ आली तेव्हा मग ती अशी आली.”

हेही वाचा – अभिनेत्री ईशा केसकर दिसणार ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेत? ‘या’ कारणामुळे चर्चांना उधाण

“‘देवमाणूस’ मालिकेच्या वर्षभरा आधी मी पूर्णपणे कामापासून लांब होते. संपूर्ण रुटीन माझं मेडिटेशन, सेल्फ कंट्रोल, एक वेळच जेवायचे. पण आता सध्या हे कामामुळे जमतं नाही. त्यावेळेस खूप रुटीन होतं. मी पहाटे ४ उठायचे. हे सगळं केलं होतं. कुठेतरी त्याच फळ आता मिळतंय. आता कुठेतरी सलग कामं मिळतायत. मला स्वामींची प्रचित खूप छोट्या-छोट्या गोष्टींमधून आलीये आणि मोठ-मोठ्या गोष्टींमधूनही आली आहे. बिग बॉसच म्हणा. कारण बिग बॉसनंतर चार चित्रपट, मालिका, इव्हेंट हे सगळं काही आलं आणि ही सोपी गोष्ट नाहीये. ते म्हणतात ना, बिग बॉसमध्ये करिअर संपलेले व्यक्ती असतात. तशापैकीच मी एक होते.”

हेही वाचा – “मी सात महिने घरी बसलेलो, कारण सुबोध भावे…”, चिन्मय मांडलेकरनं सांगितला ‘तो’ किस्सा

पुढे तेजस्विनी म्हणाली की, “मी एकदा गावी गेले होते. तेव्हा मुंबईला परत येताना माझी गाडी पूर्णपणे बिघडली होती. मला खूप तातडीने मुंबईला यायचं होतं. मी फक्त स्वामींना म्हटलं, मला मुंबईपर्यंत पोहोचवा. तर मी गावावरून मुंबईला एवढी गाडी बिघडलेली असतानाही कुठलीही समस्या न येता पोहोचले. अशा छोट्या गोष्टींमध्येही मला प्रत्यय येतो. फक्त तुम्ही विश्वास ठेवा.”

हेही वाचा – Video: ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’च्या मंचावर अशोक सराफ झाले भावुक; नक्की काय घडलं? पाहा

यानंतर तेजस्विनीला विचारलं की, ‘याच्या आधी तू स्वामींना मानायची?’ याबाबत ती म्हणाली की, “हो मी लहानपणापासून मानते. गावाला आमच्या येवल्याला स्वामींचं केंद्र आहे. आपण मठ म्हणतो, तसं आमचं केंद्र आहे. तिथे नकळत जायचे. आमचे बाबा लष्करात असल्यामुळे आमच्या घरातील वातावरण खूप छान आहे. माझे आजोबा खूप आध्यात्मिक आहेत. ते जंगलीदास महाराजांच करतात. ते आणि मी ध्यानाला बसायचो. आम्ही सगळं करायचो. पण हे जाणवलं नव्हतं की, हा माझ्या आयुष्याचा भाग आहे. पण आपण जेव्हा आयुष्यात खूप वाईट परिस्थितीत असतो आणि आपल्याला मार्गदर्शनाची गरज असते. तेव्हा ते आपोआप मार्गदर्शन मिळतं. तेव्हापासून मी अध्यात्माकडे पुन्हा वळाले. मी पहिल्यापासून अशीच आहे. अष्टविनायकला जा वगैरे. आई माझी वैतागली होती. मला एकेदिवशी म्हणाली, तुला करिअर करायचं आहे की देव दर्शन करायचं आहे हे ठरवं.”

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tuzech mi geet gaat aahe fame tejaswini lonari talk about swami samarth pps