Rituraj Singh last rites: सुप्रसिद्ध ऋतुराज सिंह यांचं हृदय बंद पडल्याने सोमवारी (१९ जानेवारी रोजी) निधन झालं. त्यांनी अनेक मालिका, चित्रपट व सीरिजमध्ये काम केलं होतं. त्यांनी वरुण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा, रुपाली गांगुली यांच्याबरोबर स्क्रीन शेअर केली होती. त्यांच्या निधनाने मनोरंजसृष्टीवर शोककळा पसरली आहे. वरुण धवनसह अनेक कलाकारांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

वरुणने इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करीत लिहिलं, “भावपूर्ण श्रद्धांजली ऋतुराज सर, त्यांच्याबरोबर काम करतानाचा अनुभव खूप चांगला होता. काही महिन्यांपूर्वी ‘बेबी जॉन’ चित्रपटाच्या सेटवर त्यांच्याशी भेट झाली होती. ओम शांती.” वरुण व ऋतुराज यांनी ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ चित्रपटात एकत्र काम केलं होतं. तसेच त्याचा आगामी चित्रपट ‘बेबी जॉन’मध्ये ऋतुराज सिंह दिसणार असल्याचं वरुणने स्पष्ट केलंय.

हेही वाचा – अभिनेते ऋतुराज सिंह यांचे हृदय बंद पडल्याने निधन

Varun Dhawan
वरुण धवनची इन्स्टाग्राम स्टोरी

ऋतुराज यांचा मित्र अभिनेता अमित बहल यांनी ‘इंडियन एक्सप्रेस’ ला दिलेल्या माहितीनुसार, ऋतुराज सिंह यांचे रात्री १२.३० वाजता निधन झाले. “ते आजारी होते. स्वादुपिंडाशी संबंधित काही समस्यांमुळे १५ दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काही दिवसांपूर्वी ते घरी परतले होते, पण काल त्यांना अशक्तपणा जाणवत असल्याने पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच हृदय बंद पडल्याने त्यांचं निधन झालं,” असं अमित बहल म्हणाले.

शाहरुख खान अन् ऋतुराज सिंह होते एकाच वर्गात, SRK च्या आग्रहाखातर मुंबईत आले अन्…, त्यांनीच सांगितलेला किस्सा

अमित यांनी ऋतुराज सिंह यांच्या अंत्यसंस्काराबद्दलही माहिती दिली. त्यांनी ऋतुराज यांच्या कुटुंबाने तयार केलेलं माहितीपर कार्ड शेअर केलं. मुंबईतील वर्सोवा, अंधेरी येथील ऋतुराज यांच्या घरी सकाळी ९ वाजतापासून त्यांचे अंतिम दर्शन घेता येतील. त्यानंतर मुंबईतील ओशिवरा येथील हिंदू स्मशानभूमीत सकाळी साडेदहा वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, असं कार्डमध्ये लिहिलं आहे.

Rituraj Singh Funeral
अमित बहल यांनी ‘इंडियन एक्सप्रेस’ ला पाठवलेलं कार्ड

दरम्यान, ऋतुराज ‘अपनी बात’, ‘ज्योती’, ‘हिटलर दीदी’, ‘शपथ’, ‘वॉरियर हाय’, ‘आहट’, ‘अदालत’, ‘दिया और बाती’ अशा अनेक मालिकांमध्ये झळकले होते. याशिवाय त्यांनी ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’, ‘सत्यमेव जयते २’, ‘थुनिवू’, ‘जर्सी’, ‘हम तूम और घोस्ट’ या चित्रपटांमध्ये काम केलं होतं.