टेलिव्हीजन विश्वाला मोठा दुःखद धक्का बसला आहे. सुप्रसिद्ध अभिनेता सिद्धांत वीरचं आज (११ नोव्हेंबर) निधन झालं. तो ४६ वर्षांचा होता. जिममध्ये व्यायाम करत असताना त्याला हृदयविकाराचा झटका आला. यादरम्यान सिद्धांत जमिनीवर कोसळला. त्याच्या निधनानंतर कलाकार मंडळींनाही मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियाद्वारे सिद्धांतला श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. अशामध्येच त्याची शेवटची इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे.

सिद्धांत सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय होता. व्यायाम करतानाचे बरेच फोटो व व्हिडीओ सिद्धांतने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत. त्याची शेवटची इन्स्टाग्राम पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. या पोस्टमध्येही तो फिटनेसबाबतच बोलत आहे.

सिद्धांतने काही दिवसांपूर्वी शेअर केलेली पोस्ट ही प्रमोशनल पोस्ट असली तरी फिटनेसबाबत त्याने यामधून सांगितलं आहे. प्रोटीन प्रॉडक्टचा फोटो शेअर करत तो म्हणाला, “माझ्या तीन जीवनावश्यक गोष्टी. मी कामावर, घरी किंवा कुठेही असलो तरीही बरोबर असणारच.”

आणखी वाचा – जिममध्ये व्यायाम करताना टीव्ही अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशीचे निधन

सिद्धांतची शेवटची पोस्ट ही एका प्रोटीन पावडरसंदर्भातील प्रमोशनल पोस्ट आहे. या पोस्टमध्ये त्याने संबंधित प्रोडक्टबद्दल भाष्य केलं आहे. मात्र कुठेही त्याने आपण या प्रोटीन पावडरचं सेवन करतो असा स्पष्ट उल्लेख केलेला नाही.

दरम्यान, सिद्धांतची ही शेवटची पोस्ट पाहून त्याचे चाहतेही भावूक झाले आहेत. या पोस्टवर कमेंट करून अनेकांनी त्याला श्रद्धांजली वाहिली आहे. ‘कुसुम’, ‘वारिस’ आणि ‘सूर्यपुत्र कर्ण’ अशा मालिकांमुळे सिद्धांत लोकप्रियता मिळाली. त्यानंतर ‘कसौटी जिंदगी की’, ;कृष्णा अर्जुन’, ‘क्या दिल में है’ अशा मालिकांमध्ये त्याने महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारल्या. सिद्धांतने मॉडेल म्हणून करिअरची सुरुवात केली होती. आज त्याच्या निधनानंतर हळहळ व्यक्त केली जात आहे.

Story img Loader