लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री दलजीत कौर काही दिवसांपासून मोठ्या चर्चेत आहे. तिने तिच्या पतीवर विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केला होता. आता तिने तिचा पती निखिल पटेलविरुद्ध एफआयआर दाखल केल्याने ती पुन्हा चर्चेत आली आहे.

दलजीत कौरने क्रूरता आणि विश्वासाचे गुन्हेगारी उल्लंघन असे आरोप लावून, निखिल पटेलविरुद्ध एफआयआर दाखल केल्याची माहिती ‘टाइम्स नाऊ’ने दिली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, भारतीय न्याय संहितेच्या कलम ८५ आणि कलम ३१६(२) अंतर्गत निखिल पटेलवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भारतीय न्याय संहितेत समाविष्ट असलेल्या कलम ८५ नुसार, महिलेचा पती किंवा पतीच्या नातेवाइकाने महिलेशी क्रूर वर्तन केले, तर त्याला तीन वर्षांचा कारावास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते. त्याबरोबरच कलम ३१६(२)मध्ये, जो कोणी विश्वासाचे गुन्हेगारी उल्लंघन करील, त्याला पाच वर्षांची कारावासाची शिक्षा, या शिक्षेचा कालावधी वाढू शकतो किंवा त्याला दंड भरावा लागू शकतो किंवा दोन्ही शिक्षा भोगाव्या लागू शकतात.

हेही वाचा: “माझी मातृभाषा कन्नड पण, महाराष्ट्राने मला…”, सुरेखा कुडचींचा वर्षा उसगावकरांना पाठिंबा; म्हणाल्या, “त्यांचा अपमान…”

दलजीत कौरने एक्स अकाउंटवर पोलिस अधिकाऱ्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता दर्शविणारी पोस्ट शेअर केली आहे. तिच्या या पोस्टने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिने या पोस्टमध्ये सह पोलीस आयुक्त अनिल पारसकर, उपायुक्त कृष्णकांत उपाध्याय, वरिष्ठ निरीक्षक योगेंद्र पाचे, तपासणी अधिकारी सचिन शेळके यांच्यासह महिला शिपाई यांना धन्यवाद दिले आहेत. एका महिला या देशात सुरक्षित आहे, याची जाणीव करून दिल्याबद्दल आग्रीपाडा पोलिस ठाण्याचे आभार मानते, असे तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच दलजीतने निखिल आणि त्याची गर्लफ्रेंड सफिना नजर यांच्या फोटोंचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर करीत, अश्रू थांबत नाहीत, असे म्हटले होते. दलजीतने २०२३ मध्ये केनियातील निखिल पटेल नावाच्या व्यक्तीशी लग्न केले होते. लग्नानंतर ती विदेशात स्थायिक झाली होती; पण अवघ्या आठ महिन्यांतच ती मुंबईला परत आली होती. त्यानंतर तिने पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचे आरोप केले होते.