छोट्या पडद्यावरील ‘अगले जनम मोहे बिटिया ही कीजो’ फेम अभिनेत्री रतन राजपूत बऱ्याच काळापासून कलाविश्वापासून दूर आहे. परंतु, सध्या ती युट्यूबवर व्हिडीओ बनवत प्रेक्षकांचे मनोरंजन करत असते. अलीकडेच ‘आज तक’ वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत रतनने इंडस्ट्रीतील कास्टिंग काऊचबाबत खुलासा केला आहे.
हेही वाचा : “तू कधीच चांगली आई होणार नाहीस”, आलिया भट्टने सांगितला ‘तो’ प्रसंग; म्हणाली, “कुटुंबासाठी मी माझे काम…”
अभिनेत्री रतन राजपूत म्हणाली, “इंडस्ट्रीमधील कास्टिंग काऊचबाबत मी कधीच उघडपणे बोलले नाही. मीटू चळवळ सुरु असतानाही मी याबाबत भाष्य केले नव्हते. मी युट्यूबवर सक्रिय असते म्हणून अनेकजण माझ्याकडे ई-मेल करून इंडस्ट्रीबाबत विचारपूस करतात. ते मला मार्गदर्शन करायला सांगतात आणि या तरुणपिढीला इंडस्ट्रीमधील सत्य कळाले पाहिजे यासाठी मी नेहमीच प्रयत्न करते.”
कास्टिंग काऊचबाबत सांगताना रतन राजपूत म्हणाली, ओशिवरा येथील हॉटेलमध्ये ऑडिशन्स सुरु होते. “मी सुद्धा त्याठिकाणी ऑडिशनसाठी गेले होते. तिथे अनेक नावाजलेले कलाकार आलेले पाहिले, मी ऑडिशन दिली पण, तेव्हा दिग्दर्शक उपस्थित नव्हता. दिग्दर्शकाच्या टीमबरोबर उपस्थित असलेल्या एका टीमने मला सांगतिले ‘मॅडम, तुम्ही खूप छान काम केले. सर तुमच्याबद्दलच बोलत आहेत, तुमची निवड होईल.’ मी म्हटलं ठीक आहे.”
रतन पुढे म्हणाली, “माझी सवय होती मी केव्हाच ऑडिशनसाठी एकटे गेले नाही. त्यादिवशी माझ्यासह माझा मित्र आला होता तो डान्ससाठी ऑडिशन देणार होता. ऑडिशन झाल्यावर मला आयोजकांनी वरच्या मजल्यावर जाण्यास सांगितले. तिथे सगळेजण आम्हाला कोल्ड ड्रिंक पिण्याची विनंती करत होते, मला इच्छा नसतानाही एक घोट प्यावा लागला. मग ते आयोजक मला म्हणाले तुम्हाला आता पुढच्या ऑडिशनसाठी बोलवले जाईल. मला शंका येऊ लागली त्या कोल्ड ड्रिंकमध्ये काहीतरी मिसळले आहे, ते कोल्ड ड्रिंक पिऊन मला अस्वस्थ वाटू लागले.”
रतन पुढे म्हणाली, “आयोजकांनी सांगितल्याप्रमाणे मी आणि माझा मित्र दुसऱ्या राऊंडसाठी गेलो होतो ती जागा खूप विचित्र होती. त्या खोलीत प्रकाश नव्हता, कपडे सर्वत्र विखुरलेले होते. मला तिथे एक बेशुद्ध मुलगी दिसली. एकंदर मला सगळाच अंदाज आला आणि मी त्या जागेवरून पळून आले.”