प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री वैशाली ठक्करने १६ ऑक्टोबरला गळफास घेत आत्महत्या केली. इंदौरमधील तिच्या राहत्या घरी हा प्रकार घडला. तिच्या निधनानंतर टीव्ही जगताला मोठा धक्का बसला. वैशालीचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडल्यानंतर तेजाजी नगर पोलीस ठाण्यात याबाबत केस दाखल करण्यात आली. यावेळी तिच्याकडे एक सुसाइड नोटही सापडली. या सुसाईड नोटद्वारे ती तणावाखाली असल्याची माहिती समोर आली. तसेच एक्स बॉयफ्रेंड तिला त्रास देत असल्याचंही समोर आलं. आता वैशालीचा भाऊ व वडिलांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
वैशालीच्या भावाने सांगितले की, “वैशाली राहुलला तिचा चांगला मित्र मानायची. पण मी तुला बदनाम करेन अशी तो तिला सतत धमकी द्यायचा. वैशालीने सगळ्या गोष्टी डायरीमध्ये लिहून ठेवल्या आहेत. जिथे कुठे वैशाली-राहुल फिरायला गेले असतील तिथले फोटो त्याच्याकडे होते. त्यावरूनही तो तिला धमकी द्यायचा. मी तुझा संसार कधीच सुखाचा होऊ देणार नाही असं तो सतत म्हणायचा. आणि तो तसंच वागला. गेल्यावर्षी माझ्या बहिणीने अभिनंदन सिंहबरोबर साखरपुडा केला होता. पण अभिनंदनलाही त्याने चुकीच्या गोष्टी सांगत दोघांना एकमेकांपासून दूर केलं.”
पुढे तो म्हणाला, “आधी आम्हाला या सगळ्या गोष्टींबाबत काहीच माहित नव्हतं. पण आत्महत्या करण्यापूर्वी एक दिवस आधी वैशालीने या सगळ्या गोष्टी आई-वडिलांना सांगितल्या. त्यानंतर माझ्या वडिलांनी राहुलच्या वडिलांना फोन करत त्याला समजावून सांगण्यास सांगितलं. आम्ही विचार केला होती पोलिसांमध्ये तक्रार करायला हवी. पण त्याआधीच वैशाली गेली.”
आणखी वाचा – एक्स बॉयफ्रेंडच्या त्रासाला कंटाळली होती वैशाली ठक्कर, सुसाइड नोटमधून झाला मोठा खुलासा
इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिच्या वडिलांनी सांगितलं की, “मी माझ्या मुलीला गमावलं. तिला खूप त्रास झाला आहे. आम्हाला आता न्याय हवा आहे. गेल्या अडीच वर्षांपासून ती इतकं सहन करत आहे हे आम्हाला माहितच नव्हतं. आम्हाला या गोष्टींचा अंदाज असता तर आम्ही असं होऊ दिलं नसतं. २० ऑक्टोबरला तिचं कोर्टामध्ये लग्न होणार होतं. राहुलबाबत आम्हाला काही माहिती असतं तर आम्ही याविरुद्ध आवाज उठवला असता. आम्हाला न्याय द्या.” आपल्या मुलीच्या निधनाबाबत बोलत असताना वैशालीच्या वडिलांना अश्रू अनावर झाले होते.