सध्या अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाल्या आहेत. ‘झी मराठी’ वाहिनीवर येत्या काळात पाच नव्या मालिका सुरू होणार आहे. ‘पारु’, ‘शिवा’ या दोन नव्या मालिका १२ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. तर ‘जगद्धात्री’, ‘पुन्हा कर्तव्य आहे’, ‘नवरी मिळे हिटलरला’ या लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. दुसऱ्या बाजूला काही दिवसांपूर्वी ‘स्टार प्रवाह’ने एका नव्या मालिकेची घोषणा केली. ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही नवी मालिका ‘स्टार प्रवाह’वर येत्या काळात सुरू होणार आहे.
‘स्टार प्रवाह’च्या ‘घरोघरी मातीच्या चुली’ या नव्या मालिकेत ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्री रेश्मा शिंदे पाहायला मिळणार आहे. तसेच इतर कलाकार मंडळी कोण असणार आहे, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. अशात ‘स्टार प्रवाह’ परिवारात दोन नवे सदस्य सामील होणार आहे. यासंदर्भात सोशल मीडियावर नुकतीच पोस्ट शेअर केली आहे.
“आपल्या स्टार प्रवाह परिवारात सामील होणारे हे दोन नवीन सदस्य कोण हे जाणून घेण्यासाठी बघत राहा स्टार प्रवाह…,” असं कॅप्शन लिहित ‘स्टार प्रवाह’च्या सोशल मीडियावर एक फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोमध्ये नव्या सदस्याचा चेहरा लपवला आहे. या फोटोवर लिहिलं आहे, “तयार व्हा आपल्या स्टार प्रवाह परिवात २ कमाल सदस्यांचा स्वागतासाठी.” ‘स्टार प्रवाह’च्या या पोस्टमुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे.
‘स्टार प्रवाह’च्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. या दोन नव्या चेहऱ्यांमध्ये ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेतील पश्या म्हणजे अभिनेता आकाश नलावडे असल्याचा अंदाज नेटकरी लावत आहेत. पण आता हे दोन नवे सदस्य कोण असणार? हे सदस्य कोणत्या मालिकेत झळकणार? ‘घरोघरी मातीच्या चुली’ की दुसरी नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तर येत्या काळात मिळणार आहेत.