प्रसिद्ध अभिनेत्री व निर्मात्या कविता चौधरी यांचे निधन झाले आहे. काल रात्री (१५ फेब्रुवारीला) हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. वयाच्या ६७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कविता यांनी अभिनयसृष्टीत आतापर्यंत अनेक मालिका व जाहिरातींमध्ये काम केले आहे. दूरदर्शनच्या ‘उडान’ व ‘योर ऑनर’ या टीव्ही मालिकांची निर्मिती करून, त्यांनी मनोरंजन विश्वात वेगळी ओळख निर्माण केली होती.
हेही वाचा- ‘महाभारत’ मधील ‘कृष्णा’चे IAS अधिकारी असलेल्या एक्स पत्नीवर गंभीर आरोप, पोलिसांत तक्रार देत म्हणाले…
कविता चौधरी यांचे पुतणे अजय सायल यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या काही वर्षांपासून कॅन्सरने त्रस्त होत्या. त्यांच्यावर दीर्घकाळ उपचार सुरू होते. अमृतसरच्या पर्वती देवी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज (१६ फेब्रुवारीला) अमृतसर येथील शिवपुरीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
हेही वाचा- “माझ्या कमाईचा मुख्य स्त्रोत..” पहिला इंडियन आयडॉल अभिजीत सावंतचा मोठा खुलासा
कविता चौधरी यांना १९८९ मध्ये प्रसारित झालेल्या ‘उडान’ मालिकेमधून खरी ओळख मिळाली. या मालिकेत त्यांनी आयपीएस अधिकारी कल्याणी सिंह यांची भूमिका साकारली होती. या मालिकेचे लेखन व दिग्दर्शनही त्यांनीच केले होते. ही मालिका त्यांची बहीण कांचन चौधरी भट्टाचार्य यांच्या जीवनावर आधारित होती; ज्या किरण बेदीनंतर दुसऱ्या महिला आयपीएस अधिकारी बनल्या होत्या. मालिकेबरोबर कविता यांनी अनेक जाहिरातींमध्येही काम केले होती. १९८० व १९९० च्या दशकात प्रसिद्ध असलेल्या डिटर्जंट उत्पादन असलेल्या ‘सर्फ’च्या जाहिरातींमध्ये त्यांनी ललिताजी हे पात्र साकारले होते.