काही वर्षांपूर्वी छोट्या पडद्यावर ‘उंच माझा झोका’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि प्रचंड लोकप्रिय झाली. या मालिकेतून रमाबाई रानडे यांचा जीवन प्रवास उलगडला गेला. या मालिकेत रमाबाई रानडे यांच्या बालपणीची भूमिका तेजश्री वालावलकर हिने साकारली होती. त्या भूमिकेसाठी तिचं खूप कौतुक झालं. अनेकांना वाटत होतं की ही तिची पहिली मालिका आहे. पण आता तेजश्रीनेच करिअरबद्दल भाष्य करत अभिनय क्षेत्रातील तिची सुरुवात कधी झाली हे सांगितलं आहे.
‘लोकसत्ता ऑनलाइन’शी बोलताना तिने सांगितलं, “उंच माझा झोका ही मालिका जेव्हा मी केली तेव्हा मी पाचवीत होते. पण माझ्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीची सुरुवात मी तीन वर्षांची असतानाच झाली होती. मी पहिलीत होते तेव्हा मी माझी पहिली मालिका केली. ‘गोष्ट एका जप्तीची’ असं त्या मालिकेचं नाव होतं. ती मालिका स्मिता तळवलकर यांची होती आणि त्यात मला अशोक सराफ यांच्याबरोबर काम करायला मिळालं. त्यानंतर माझा पहिला चित्रपट ‘आजी आणि नात’ मी केला त्यात मी सुलभा देशपांडे यांच्याबरोबर स्क्रीन शेअर केला.”
आणखी वाचा : ‘उंच माझा झोका’तील छोटी रमा आता झाली आहे मोठी! तेजश्री वालावलकरची शैक्षणिक पार्श्वभूमी वाचून व्हाल थक्क
पुढे ती म्हणाली, “अशा काही मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर मला ‘उंच माझा झोका’ ही मालिका मिळाली आणि तिने मला लोकांपर्यंत पोहोचवलं. ती मालिका संपल्यानंतर पुढच्या दोन वर्षांत मी ‘मात’ आणि ‘चिंतामणी’ हे दोन चित्रपट केले. ‘मात’ या चित्रपटासाठी मला शासनाचा पुरस्कारही मिळाला. तर ‘चिंतामणी’ या चित्रपटामध्ये मी भरत जाधव यांच्याबरोबर काम केलं. त्यामुळे मला आतापर्यंत अनेक दिग्गज कलाकारांकडून खूप काही शिकण्याची संधी मिळाली आहे. पण हे चित्रपट केल्यानंतर माझ्याकडे येणाऱ्या संधी या ‘उंच माझा झोका’ला अनुसरून होत्या किंवा माझ्या वयापेक्षा अगदीच मोठ्या होत्या. त्यामुळे मी अभिनयातून थोडासा ब्रेक घेतला. याचं मुख्य कारण म्हणजे ‘उंच माझा झोका’मुळे माझी प्रेक्षकांमध्ये तयार झालेली इमेज मला बदलायची होती.”
शेवटी ती म्हणाली, “दहावी झाल्यानंतर मी ‘झिंदगी नॉट आउट’ ही मालिका केली. मालिकेच्या शूटिंगमुळे मुंबई-पुणे सारखा प्रवास करणं आणि अभ्यास सांभाळणं हे थोडं कठीण असल्याने मी दहावीनंतर बाहेरूनच कला शाखेचं शिक्षण घेतलं. गेल्याच वर्षी कला शाखेत मी पदवी मिळवली आहे. भविष्यात मला अभिनयातच करिअर करायचं आहे. त्यामुळे अभिनयाबरोबरच मी प्रोडक्शनबद्दल माहिती घेणं, अभिनयाच्या दृष्टीने वाचन करणं, व्हीएफएक्सबद्दलची माहिती मिळवणं या गोष्टी मी करत आहे.”