ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि न्यायमूर्ती महादेवराव रानडे यांच्या पत्नी रमाबाई रानडे यांच्या आयुष्यावर आधारित असलेली ‘उंच माझा झोका’ मालिका चांगलीच गाजली होती. ‘झी मराठी’ वाहिनीवरील या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत कायमची छाप उमटवली. अजूनही ही मालिका तितक्याच आवडीने ऑनलाइन पाहिली जाते. तसंच ‘उंच माझा झोका’ मालिकेचं शीर्षकगीत बऱ्याच जणांच्या मोबाइलची रिंगटोन आहे. अशा या लोकप्रिय मालिकेला १३ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने मालिकेतील छोटी रमा साकारणाऱ्या तेजश्री वालावलकरने सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली आहे.

अभिनेत्री तेजश्री वालावलकरने ‘उंच माझा झोका’ मालिकेचे काही फोटो शेअर करत लिहिलं, “५ मार्च २०२५…गेल्या काही वर्षांपूर्वी म्हणजे १३ वर्षांपूर्वी याच दिवशी तो क्षण आला होता, ज्याची वाट सगळे बघत होते. ‘झी मराठी’वर पहिल्यांदा ‘झुले उंच माझा झोका’ हे शीर्षकगीत वाजलं होतं आणि पहिला भाग प्रसारित होऊन मालिका सृष्टी बदलून टाकणाऱ्या, स्वतःचं नवं सोन्याचं पान, अढळ स्थान निर्माण करणाऱ्या आणि फक्त प्रेक्षकांच्याच नाहीतर एका नव्या इतिहासाचा झोका उंच नेणाऱ्या आपल्या सगळ्यांच्या ‘उंच माझा झोका’ या मालिकेला सुरुवात झाली होती. यमुने ही हाक छोट्या पडद्यावर आली आणि सगळे त्या सालस भावात सात्विक काळात रमून गेले. आणि सुरू झाला एक नवा प्रवास…”

“माझा तेजश्रीचा ही रमा म्हणून…असंख्य अनुभव, अगणित प्रेम आणि द्विगुणीत आशीर्वाद मिळवून देणाऱ्या या प्रवासाची खऱ्या अर्थाने सुरुवात ५ मार्चला झाली होती…अजूनही आठवतंय ‘उंच माझा झोका’चा पहिला भाग प्रसारित झाला आणि फोन, मेसेज नंतर पत्रांनी मन भरून गेलं….काही दिवस हे विसरता येत नाहीत. कारण ते सगळ्यांच्या प्रेमाने भरलेले असतात तुमच्या रसिकांच्या प्रेमाने गेलेला हा ‘उंच माझा झोका’ आणि आजची ही ५ मार्च तारीख नेहमीच खास राहील…हा प्रवास खास झाला हे साकारू शकलं, झी मराठी, विरेंद्र प्रधान, विक्रम गायकवाड यांच्यामुळेच,” असं तेजश्री वालावलकरने लिहिलं आहे.

दरम्यान, ‘उंच माझा झोका’ मालिकेतील तेजश्री वालावलकर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. काही महिन्यांपूर्वा ‘कलाकृती मीडियाशी’ संवाद साधताना तेजश्री म्हणाली होती, “मी सध्या पुन्हा एकदा सर्वांच्या भेटीला यायला सज्ज होतेय. लवकरच तुम्हा सर्वांच्या समोर अनेक गोष्टी येतील. पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना एका वेगळ्या रुपात मी भेटणार आहे.”

Story img Loader