गेल्या काही वर्षांपासून ऐतिहासिक मालिकांना यश येत नाहीये. ‘सावित्री-ज्योती’, ‘लोकमान्य’, ‘स्वामिनी’ आशा काही मालिका टीआरपी नसल्यामुळे बंद झाल्या. तर नुकतीच विरेंद्र प्रधान दिग्दर्शित ‘यशोदा’ ही मालिका बंद झाली. काही दिवसांपूर्वी विरेंद्र प्रधान यांनी याबद्दल एक पोस्ट लिहिली होती. तर आता त्यांनी एक मोठी पोस्ट लिहीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री यांना कळकळीची विनंती केली आहे.
काय आहे विरेंद्र प्रधान यांची पोस्ट?
सन्मा. मुख्यमंत्री / उपमुख्यमंत्री साहेब ,
नमस्कार.
( “यशोदा , श्यामची आई” ही मालिका आणि इतर कलाविष्कारांसंदर्भात )
कुपोषित बालकांचे पालन पोषण जशी आई वडिलांची जबाबदारी आहे, तशीच ती समाज म्हणून आपलीही आहे असे मला वाटते. ते जगवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न व्हायला हवेत . प्रसंगी कठोरसुद्धा व्हायला हवं. बाळ गेल्यावर त्याच्या बातमीने डोळे पाणावले तर त्याला काही अर्थ उरत नाही.
हे कुपोषित बालक कोण आहे, या संदर्भात ? तर ते आहे ‘मराठी नावाचे कलात्मक बाळ’. मालिका, नाटक, सिनेमा, लोकनाट्य, तमाशा, नाट्यसंगीत, भारतीय शास्त्रीय संगीत, भावगीते वगैरे वगैरे . प्रेक्षक नाहीत… प्रेक्षक नाहीत… ही ओरड ऐकायची, किंवा सांस्कृतिकसंदर्भात कुठे काही किंचित ओरड झाली की, एखाद्या या क्षेत्रातल्या लोकांच्या एखाद-दोन मिटींग्स घ्यायच्या आणि पुन्हा सगळे विसरून जायचे हा भाग कायमचा!
साने गुरुजींवरची ‘श्यामची आई’ ही आमची मालिका टीआरपी नाही या कारणास्तव बंद झाली . मी वाहिन्यांना दोष देणार नाही, कारण, अशा मालिका घेऊन येण्याचे धाडस त्या कायम करत आहेतच. ‘धाडस’ हा शब्द मला आपल्याच भाषेसाठी वापरावा लागतोय यातच सगळे आले. काही वर्षांनी हेसुद्धा संपेल कारण त्यावेळी, राजकारणातसुद्धा इंग्रजी पिढी आली असेल. आपले साहित्य, संस्कृती याचा दुरान्वये संबंध त्यांच्याकडे शिल्लक राहिला नसेल. म्हणूनच आज, जोपर्यंत आपल्यासारखे जाणकार आणि मराठीचं सांस्कृतिक कार्य जोपासणारी मंडळी आहेत, तोपर्यंत मनी आले ते बोलण्याचे धाडस करत आहे.
मराठी कला बासनात गुंडाळली जातेय का ? नसेल तर उत्तमच! पण जर हो तर मग हे का बरे होत आहे? आपण दुर्लक्ष केले म्हणून होईल. मूल जेवत नाही म्हणून आई वडील जसे विविध प्रकारे प्रयत्न करतात, तसेच प्रयत्न करणारे कर्तव्यदक्ष आई वडील तुम्हाला होण्याची आता वेळ आली आहे हे नक्की . प्रेक्षकांना लोकमान्य, सावित्री-ज्योती, यशोदा: गोष्ट श्यामच्या आईची, उंच माझा झोका, संत ज्ञानेश्वर, स्वामिनी अशा मालिका पाहायच्या नाहीत. प्रथितयश असे टीव्हीवर चमकणारे लोक नाटकात घेतले नाहीत तर नाट्यगृह ओस पडतायत आणि या कलाकारांना घेऊन नाटक केले तरी लोक येतीलच याची शाश्वती नाही, असं बेभरवशाचं सगळं झालंय. सध्याचे अगदी ताजे उदाहरण देतो. एका कल्पक आणि प्रथितयश दिग्दर्शकाच्या एका पाठोपाठ दोन कलाकृती आल्या. एक चित्रपट या दिग्दर्शकाच्या आजोबांच्या जीवनावर होता. ते प्रथितयश शाहिर होते. पण लोक चित्रपटगृहात फिरकले नाहीत. दुसरा याच दिग्दर्शकाचा चित्रपट आला, तुफान चाललाय. पण हे असे का झाले याचा विचार कोणी केला नसेल. कारण यश दिसले की आपण हुरळून जातो आणि ९५ टक्के मरत चाललेल्या आपल्या सांस्कृतिक परंपरेच्या देवाला आपण चंदनाचा टिळा लावतो. एका चित्रपटाचं, दोन नाटकांच किंवा एखाद्या आशयसंपन्न मालिकेचे यश म्हणजेच मराठी आणि आपले साहित्य टिकले असे म्हणणे म्हणजे शंभर कुपोषित बालके मेली, पण आम्ही दोन जगवली ना असे म्हणण्यासारखे झाले. मराठी माणसाच्या मुंबईत साधी इमारतींची नावे मराठी नाहीत. असली तर हाताच्या बोटावर मोजता येतील अशी. पुणे त्या मानाने बरे, तिकडे किमान साहित्यिकांच्या, कलाकारांच्या नावाने काही पदपथ तरी आहेत. दादासाहेब फाळके चित्रनगरीमध्ये आपण गेलात की डाव्या उजव्या बाजूला मोठमोठे फलक आहेत. कालिया मैदान, फरीश्ते मैदान, रॉक ऑन मैदान आणि अशी बरीच लोकेशन्सची भयानक नावे तुम्हाला दिसतील. त्या जागांचं बुकिंगही तुम्हाला त्याच नावे करावे लागते. का असे ? पु.ल. देशपांडे , विजय तेंडुलकर , राजा परांजपे , सुधीर फडके , सुलोचना ताई, भालजी पेंढारकर, व्ही शांताराम अशा दिग्गज लोकांची नावे देता आली नसती का? छोट्या छोट्या पाऊलखुणा आपण नाही का ठेऊ शकत, ज्यांनी आपली सांस्कृतिक जडणघडण केली अशा महान लोकांच्या? आपणच तर राहिलेले उरलेले मराठी माणसे करणार, नाहीतर आहेतच ओरबाडणारे! चित्रनगरीमधे ५० टक्के मराठीला अनुदान मिळवण्यासाठी मला संघर्ष करावा लागला, त्या नंतर कुठे वर्षभरासाठी हे काम झाले. अजूनही तिकडे शुटिंग करणे म्हणजे मराठी माणसाला दिव्य आहे हे आपण कोणाला ही विचारू शकता. मराठी चित्रपटगृहांना जसे मराठी चित्रपटांसाठी खेळ ठेवणे आवश्यक केले आहे तसेच मराठी वाहिन्याना असे सांगता येणार नाही का, की एक स्लॉट फक्त साहित्यिक, सांस्कृतिक परंपरा जोपासणाऱ्या मालिकांसाठी राखून ठेवावा? अशा मालिकांच्या मानेवर टीआरपीचे भूत नसेल, मालिका याच मनोरंजक चौकटीत ते बसवावे. निरस डॉक्युमेंटरी होणार नाही याची दक्षता निर्मात्यांनी घ्यावी आणि हे सगळ्या कल्पक लोकांना सहज शक्य आहे. आकाशवाणी, रेडिओ, एफएम किंवा तत्सम माध्यमांवर मराठी गाणी, मुलाखती, भाषणे यांचा भडीमार नाही का करता येणार ? भडीमार हा शब्द योग्य का आहे, कारण अशा गोष्टींचा भडीमार झाला की सायकॉलॉजिकल परिणाम दुरगामी होतो . त्या मुळे किमान आपले साहित्य, साहित्यिक, कवी, गायक, संगीतकार, खेळाडू जिवंत रहातील. पुढील पिढीसाठी आपण काहीच राखून ठेवणार नाही का ?
मुंबई एयरपोर्टवर परदेशी नागरिक येतात, त्यांचे स्वागत आपल्या मराठी गाण्यांनी, मराठी सांस्कृतिक कार्यक्रमांनी नाही का करू शकत? प्रत्यक्ष किंवा ऑडियो व्हिडीओ स्वरूपात? आपण फ्रान्सला जा, जर्मनीला जा, युरोपला जा, वेस्ट इंडिजला जा … ते लोक त्यांच्या सांस्कृतिक कलामंचाला कसे आकर्षक पद्धतीने जिवंत ठेवतात? एयरपोर्टवर उतरल्या पासून ते चौका चौकात त्यांचे संगीत वाजत असते. चित्रकार चित्रे काढत असतात. आपण ही मग कुतूहलाने चौकशी करतो की कोण बाबा तुमचा हा चित्रकार, कवी, गायक, संगीतकार? का नाही आपल्याकडे हे होत? नीता अंबानी थिएटरमधे आजकाल दर्जेदार परदेशी नाटके आणली जातात आणि हजारो रुपयाचे तिकिट असून ती हाऊसफुल होतात. मग आपण कुठे कमी पडतो? मग असे चांगले उपक्रम करण्यासाठी आधी मराठी माणसाने अंबानी व्हावे का ? तसे झाले तरच हे टिकणार का ? आपल्या प्रत्येक कलाक्षेत्रात तज्ञ मंडळी आहेत . संकल्पना आहेत, उत्साह आहे, पण कमतरता आहे ती फक्त आई वडिलांची, म्हणजेच राज्यकर्त्यांच्या इच्छाशक्तीची.
आपण सुजाण आहात. आई वडिलांप्रमाणे आपल्या सांस्कृतिक कुपोषित बालकांवर प्रेम करणारे आहात, धडाडीचे आहात. आपल्याला हे सहज शक्य आहे. आई वडिलांनीच प्रयत्न करायला हवेत हो हे मूल जगवण्यासाठी. पुढील लाखो वर्ष राहू दे की पुलंचे नाव. बाबूजींचे नाव, भालजींचे नाव, भीमसेनजींचे नाव, गावसकर-तेंडुलकरचे नाव, गायतोंडे, अवचटांचे नाव! त्यासाठी फक्त भारतरत्नच असायला पाहिजे असे असू नये. ती व्यतिमत्त्वे मोठीच आहेत आणि कदाचित पालकांशिवाय ती मोठी झाली आहेत. पण अशी किती नावे आहेत ? तिकडे महाराष्ट्र संपला का ? आपला सांस्कृतिक मंच आपण नको का जगासमोर आणायला? तो टिकवायला. खुप कष्ट नाहीयेत साहेब. पैसेही खर्च होणार नाहीयेत. गरज आहे ती इच्छाशक्तीची. कल्पकतेची आणि महोदय, आपण हे सहज जुळुवून आणू शकता. मराठी नाटक, चित्रपट, मालिका, गाणी आणि एकूणच मनोरंजन क्षेत्र हा एकच भाग असा आहे जो मानस शास्त्रीय दृष्टिकोनातून बुद्धीवर, मेंदूवर , शरीरावर होकारार्थी आणि उत्साह वाढवणारा परिणाम करतो . लंडनमधे एका हॉस्पिटलमध्ये म्युझिक थेरपी दिली जाते जिकडे लताबाईंची बारीक आवाजात गाणी लावली जातात पेशंट्सच्या बाजूला! नैराश्यात अडकलेल्या लोकांना त्यातून बाहेर काढण्यासाठी सुंदर चित्रे दाखवली जातात, कविता वाचल्या जातात, उत्तम साहित्य वाचले जात. उंच माझा झोका मालिका पाहणाऱ्या एका प्रेक्षकाचा वेंटिलेटर् काढला गेला आणि त्या पेशंटमधे सकारात्मक बदल घडले. एक ना अनेक गोष्टी आहेत साहेब! कला , कलाकार आपणच तर टिकवले राखले पाहिजेत. आपल्या मराठी कलाविश्वाला जिवंत ठेवा साहेब. प्रेक्षक नाहीत तर संपवून टाका , आजी आजोबांचा आता काही उपयोग नाही तर टाका त्यांना वृद्धाश्रमात, असे करून कसे चालेल? किती उथळ पिढी बनवणार आहोत आपण उद्याची? शाळांमध्ये तर मराठी ने मान टाकली आहे. कोण आहेत हे लोक, हे प्रेक्षक की ज्याना उत्तम दर्जेदार साहित्य, कलाभाग नकोय? ते आपलेच आहेत. सवय मोडलीये त्यांची. रस गेलाय. संवेदना संपली आहे या विषयाबद्दलची. एवढेच आहे . त्यांना फक्त जाणीव करून द्यायची आहे आणि ती कशी होणार, तर खुणा पुसून नाही तर खुणा तयार करुन. मुंबई , महाराष्ट्रात जागोजागी या खुणा दिसू दे. काही ठिकाणी सहज . काही ठिकाणी कठोर नियम करून . रस्त्यातून बाहेर फिरताना , एयरपोर्ट ला उतरल्यावर, स्टेशन ला उतरल्यावर, चित्रनगरी, नाट्यगृह, मॉल्स सगळीकडे या मराठी दिग्गज लोकांच्या छब्या, त्यांचे काम दिसू दे. कुतूहल तयार होऊ दे. आपलेच प्रेक्षक आहेत. ते येतील पुन्हा आपल्या कडे. शंभरातले पंचवीस तरी येतील. ते पुढे टिकवतील. बाहेरच्या देशांना जे शक्य आहे ते आपल्याला ही आहे. घ्या मनावर. बोलवा तज्ञांना. आपल्या चौकातून , आपल्या घरातून , आपल्या शहरातून गावातून हे सुरु करूया. टुरिझम वाढेल. प्रकल्प येतील. पैसा ही येईल . महाराष्ट्रात मराठी लोकांची ही सांस्कृतिक दादागिरी वाढीस लागू दे साहेब . आपल्या मुलांना वारसाहक्काने देऊ ना एक छान समृद्ध सांस्कृतिक महाराष्ट्र. उथळ , थिल्लरपणा , नुसता टाईमपास ही असू दे ना . पण जो आज जास्त प्रमाणात चालला आहे गणपती समोर, दही हंडी समोर, चित्रपटगृहात, टीव्हीवर. त्याला काही टॉनिक ही देणार आहोत की नाही आपण ,आपल्या सांस्कृतिक कलेचं ?शक्य आहे साहेब . सहज शक्य आहे. पैसा नाही लागत त्या साठी खुप. एक तबला आणि एका पेटीवर कमालीची लोकप्रियता मिळवलेली गाणी दिलीत ना आपल्या बाबुजीनी आणि माडगूळकरांनी. एक जोड कपड्यांत फक्त एका डफलीवर थाप मारुन जनजागृती केली ना आपल्या शाहिरांनी. एका स्टुडिओमध्ये संपूर्ण शिवशाही आणली ना भालजीनी, देसाईनी, पेशवाईचा घाट फक्त ३० बाय ३० च्या रंगमंचावर आणला ना तेंडुलकरांनी, आई तुझी आठवण येते या एका आर्त स्वरांनी काळीज पिळवटून टाकलं ना पेंढारकरांनी. पैसा नसताना यश साध्य करणे हे तर मराठी माणसाचे एका हाताचे काम. (हे सरळ आणि उपरोधिक दोन्ही बाजूने घेऊ शकतो ) कुठे आहेत ते मोहन वाघ, सुधीर भट, अरुण सरनाईक, लक्ष्मीकांत बेर्डे, जयवंत दळवी, वपू काळे, शाहीर साबळे, अमरशेख, सूर्यकांत चंद्रकांत, शांता आपटे, शांताराम बापू , वसंत देसाई, राजा गोसावी, वसंत पवार, शंकर वैद्य, बालकवी, बहिणाबाई, श्रीकांत ठाकरे ? असे आणि शेकडो. आहेत तेवढी ठिकाणे आपल्या महाराष्ट्रात जिकडे या लोकांचे नाव आणि कुतूहल तयार करता येईल . साहेब, या कलेच्या अग्निहोत्राची भूपाळी आपल्या पासून सुरु होऊ दे . आणि ती ही कायमची .
काय बोलतोय हा ? सगळं छान तर चाललंय. पण तसं नाहीये. राज साहेब ठाकरे हे कायम या विषयावर तळमळीने बोलताना दिसतात . पण फक्त ते एकटेच का बोलतायत. इतर जर बोलत नाहीयेत, तर किमान कोणी ऐकत का नाहीये ? ऐका साहेब. मी बोलायला तयार आहे. इतर सोबत आले तर आनंदच आहे पण कृपया इकडे लक्ष द्या . वेळ हातातून निसटून जाण्या आधी .
जय हिंद . जय महाराष्ट्र !
आपला कलाप्रेमी मराठी ,विरेंद्र प्रधान