अभिनेत्री तुनिषा शर्माने २४ डिसेंबर रोजी मालिकेच्या सेटवर गळफास घेत आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येमुळे कुटुंबियांसह टेलिव्हिजन विश्वालाही धक्का बसला आहे. तुनिषा शर्माच्या आईने तिचा मालिकेतील सहकलाकार आणि बॉयफ्रेंड शिझान खानवर तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला होता, त्याच्याविरोधात तक्रारही दिली होती. त्यानंतर पोलिसांनी शिझानला अटक केली होती. सुरुवातीला शिझानला चार दिवसांची कोठडी सुनावण्यात आली होती, पण त्यात पोलिसांना कोणतीही ठोस माहिती शिझानकडून मिळाली नाही, त्यामुळे त्यांनी कोर्टात त्याची कोठडी वाढवून देण्यात यावी, अशी मागणी केली होती. यावर कोर्टाने त्याच्या पोलीस कोठडीत ३० डिसेंबरपर्यंत वाढ केली आहे. अनेक जण तुनिषाच्या बाजूने बोलत आहेत, तर शिझान तुनिषाच्या आत्महत्येला जबाबदार असल्याचं म्हणत आहे. अशातच मॉडेल उर्फी जावेदने शिझानची पाठराखण केली आहे.
उर्फी जावेदने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली आहे. त्यात तिने लिहिलं, “कदाचित शिझान चुकीचा असू शकतो, त्याने तुनिषाला धोका दिलाही असेल, पण तुनिषाच्या मृत्यूसाठी आपण शिझानला जबाबदार धरू शकत नाही. कारण, जर एखादी व्यक्ती तुमच्याबरोबर राहू इच्छित नसेल, तर तुम्ही त्याला तुमच्याबरोबर राहण्यास जबरदस्ती करू शकत नाही. मुलीही नाही. तुम्ही एखाद्यासाठी तुमचा जीव द्यावा, इतकी किमती ती व्यक्ती नसते. कधी कधी आयुष्यात काहीच उरलं नाही, सगळं संपलंय असं वाटू शकतं. पण माझ्यावर विश्वास ठेवा, आयुष्यात काहीच संपत नसतं. तुम्ही त्या लोकांचा विचार करा, जे तुमच्यावर प्रेम करतात. तुम्ही स्वतःवरही थोडं प्रेम करा. आयुष्यात स्वतःचे हिरो व्हा, स्वतःला वेळ द्या. तुमच्या आत्महत्येनंतर दुःख संपत नाही. तुम्ही ज्यांना मागे सोडून जातात, त्यांना आयुष्यभर तुमच्या जाण्याचं दुःख सहन करावं लागतं,” असं उर्फी म्हणाली.
तुनिषाच्या आत्महत्येनंतर तिच्या आईची रडून रडून वाईट अवस्था झाली आहे. लेकीच्या अंत्यसंस्काराच्या दिवशी तिची आई बेशुद्ध झाली होती. तुनिषाच्या आईची अशी अवस्था पाहून अनेकांचं मन हेलावतंय. त्यांनी त्यांची एकुलती एक मुलगी गमावली आहे. तुनिषाची आई शिझानला शिक्षा व्हावी, अशी मागणी करत आहे. पण पोलिसांना अजूनपर्यंत कोणतीही संशयास्पद बाब आढळली नसून शिझानची चौकशी केली जात आहे.