Celebrity MasterChef: ‘सोनी टीव्ही’ वाहिनीवरील ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ या कार्यक्रमाचा प्रवास आता सेमी फिनालेपर्यंत येऊन पोहोचला आहे. अनेक टास्क पार करत सेमी फिनालेपर्यंत सहा स्पर्धक पोहोचले आहेत. उषा नाडकर्णी यांची सेमी फिनालेमध्ये जाण्याची थोडक्यात संधी हुकली आहे. त्या एविक्ट झाल्या आहेत. आयेशा झुलकानंतर उषा नाडकर्णी यांचं एविक्शन झालं आहे. कारण आयेशानंतर दीपिका कक्कर हिने स्वतःहून ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ला रामराम केला होता. त्यामुळे एविक्शन झालं नव्हतं. अखेर सेमी फिनाले आधी उषा नाडकर्णी बाहेर झाल्या आहेत.

‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’मध्ये आतापर्यंत फक्त मिस्टर फैजूला पांढरा अ‍ॅप्रन मिळाला आहे. त्यामुळे त्याची थेट फिनालेमध्ये एन्ट्री झाली आहे. सेमी फिनाले होण्यासाठी काळा अ‍ॅप्रन असलेल्या स्पर्धकांमध्ये एक टास्क झाला. यामध्ये एकूण पाच जण होते. अर्चना गौतम, उषा नाडकर्णी, तेजस्वी प्रकाश, गौरव खन्ना, राजीव अडातिया यांच्यामध्ये एक टास्क पार पडला. या पाच जणांसमोर तीन मिस्ट्री बॉक्स होते. या पाच जणांना एक-एक मिस्ट्री बॉक्स निवडून त्यानुसार पदार्थ बनवायचा होता. उषा नाडकर्णी यांनी रणवीर बरार यांच्या समोरील मिस्ट्री बॉक्स निवडून पदार्थ बनवला. ज्यामध्ये माशाच्या पदार्थ बनवायचा होता. माशाचा पदार्थ बनवण्यात उषा ताईंचा हातखंडा होता. पण पुढे गडबड झाली.

पदार्थ बनवताना फराह खान उषा नाडकर्णींना सतत डिवचताना दिसली. उषा ताईंनी केलेल्या एका पदार्थामधील चिकन शिजलेलं नव्हतं. त्यामुळे फराह सतत उषा ताईंना म्हणत होती की, मासा पूर्णपणे शिजला आहे ना? नीट बघा. हे सतत फराह उषा नाडकर्णी यांना आठवण करून देत होती. यावेळी रणवीर बरारदेखील उषा ताईंना म्हणाला की, आज आमची आई कार्यक्रमातून बाहेर जायला नको. पण तसंच झालं.

उषा नाडकर्णींकडून पदार्थाची थाळी सजवताना गडबड झाली. त्यांनी थेट माशाची शेपूट कापून टाकली. हीच शेपटू त्यांच्या थाळीला अजून सुंदर बनवतं होती. हेच पाहून परीक्षक रणवीर बरारने डोक्याला हात लावला. त्यानंतर परीक्षकांनी पदार्थ चाखला. तेव्हा मासा जास्त प्रमाणात शिजला गेला होता. संपूर्ण थाळीमध्ये फक्त उषा ताईंनी केलेल्या चटणीचं परीक्षकांनी कौतुक केलं. पण, इतर स्पर्धकांनी बनवलेले पदार्थ उषा ताईंच्या तुलनेत चांगले झाले होते. त्यामुळे उषा नाडकर्णी यांची सेमी फिनालेमध्ये जाण्याची थोडक्यात संधी हुकली.

‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’मधून बाहेर जाताना उषा नाडकर्णी म्हणाल्या, “मी आज सकाळीच बोलत होते की, मी आज जाणार.” त्यानंतर उषा नाडकर्णींना यांना सगळ्यांनी मिठी मारली. यावेळी फैजू, गौरव भावुक झालेले पाहायला मिळाले. शेवटी सगळ्यांनी शिट्टी वाजूवन उषा नाडकर्णी यांना निरोप दिला. आता ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’च्या सेमी फिनालेपर्यंत निक्की तांबोळी, अर्चना गौतम, तेजस्वी प्रकाश, गौरव खन्ना, राजीव अडातिया पोहोचले आहेत. यामधील कोणते स्पर्धक फिनालेमध्ये फैजूबरोबर पाहायला मिळणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.