Celebrity MasterChef Grand Finale Week: ‘सोनी टीव्ही’ वाहिनीवरील ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ हा कुकिंग शो आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. सध्या फिनाले वीक सुरू आहे. ११ एप्रिलला ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’चा ग्रँड फिनाले संध्याकाळी ८ वाजता पाहायला मिळणार आहे. पण, फिनाले वीकमध्ये काही खास पाहुणे हजर राहणार आहेत. त्यापैकी एक म्हणजे ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’च्या स्पर्धक, ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी.
‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ शोमध्ये एकूण १२ कलाकार सहभागी झाले होते. त्यापैकी पाच कलाकार ग्रँड फिनालेपर्यंत पोहोचले आहेत. निक्की तांबोळी, तेजस्वी प्रकाश, गौरव खन्ना, राजीव अडातिया, फैजल शेख या पाच जणांमधील कोण ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ जिंकणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. पण, त्याआधी या शोमध्ये जुन्या स्पर्धकांची एन्ट्री पाहायला मिळत आहे. उषा नाडकर्णी यांची गॉगल लावून डॅशिंग अंदाजात ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’मध्ये पुन्हा एन्ट्री करताना दिसत आहेत.
‘सोनी टीव्ही’ने इन्स्टाग्रामवर उषा नाडकर्णी यांचा प्रोमो शेअर केला आहे. यामध्ये सुरुवातीला उषा नाडकर्णींचा आवाज ऐकू येतो. तेव्हा पाचही स्पर्धक आश्चर्य चकीत होतात आणि उषा ताई आल्याचं ओळखतात. मग उषा नाडकर्णी गॉगल लावून, हातात एक खास पदार्थ घेऊन एन्ट्री करताना दिसत आहेत. तेव्हा उषा ताईंना पाहून राजीव जोरात ओरडतो. नंतर पटकन फैजू, गौरव, तेजस्वी उषा नाडकर्णींना भेटायला जातात. यावेळी गौरव उषा ताईंच्या पाया पडताना दिसत आहे.
मग उषा नाडकर्णी चिकनचा खास पदार्थ फराह खानसाठी देतात आणि म्हणतात, “ही रोज मला चिकनवरून टोमणे मारायची. आज मी खास तुझ्यासाठी घरून चिकन बनवून घेऊन आली आहे.” तेव्हा फराह खान म्हणते, “अरे मग अशी धमकी काय देताय?”
दरम्यान, उषा नाडकर्णी ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’च्या सेफी फिनाले आधी एलिमिनेट झाल्या होत्या. त्यांनी शोमध्ये शेवटचा पदार्थ माशाचा केला होता; जो फसला होता. ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’मधून बाहेर जाताना उषा नाडकर्णी म्हणाल्या होत्या की, मी आज सकाळीच बोलत होते की, मी आज जाणार. त्यानंतर सगळ्यांनी शिट्टी वाजूवन उषा नाडकर्णी यांना निरोप दिला होता.