गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील सामाजिक वातावरण संवदेनशील झालेलं असतानाच सोमवारी रात्री नागपूरमध्ये दोन गटांमध्ये तणाव निर्माण होऊन जाळपोळ झाल्याची घटना घडली. औरंगजेबाच्या कबरीच्या वादामुळे नागपूरमध्ये हा हिंसाचार झाला. नागपूरच्या महाल परिसरात दोन गटातील लोक समोरासमोर आले आणि त्यानंतर दोन्ही गटातील लोकांनी एकमेकांवर दगडफेक केली, जाळपोळही करण्यात आली. सध्या या परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

नागपूरमध्ये झालेल्या दंगलीवर आता राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. याशिवाय मनोरंजन विश्वातील कलाकार मंडळीही याप्रकरणी पोस्ट शेअर करत व्यक्त होऊ लागली आहे. लोकप्रिय गायक व अभिनेता म्हणून ओळखला जाणारा उत्कर्ष शिंदे त्याच्या पोस्टच्या माध्यमातून नेहमीच सामाजिक व राजकीय परिस्थितीवर भाष्य करत असतो.

नागपूरमध्ये झालेल्या दंगलीसंदर्भात आता उत्कर्षने कविता लिहीत नागरिकांना शांतता-संयम राखण्याचं आवाहन केलं आहे. “दंगल करू नका मित्रांनो तुमच्या नावावर फक्त केसेस असतील” असं अभिनेत्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

उत्कर्ष शिंदेची पोस्ट

उद्या यांची पोरं विदेशात असतील
दंगल करू नका मित्रांनो तुमच्या नावावर फक्त केसेस असतील
ना शिक्षण, ना नोकरी, ना घर, ना पैसा, ना मान-सन्मान
फक्त कोर्टाच्या पायऱ्या दिसतील
दंगल करू नका मित्रांनो
तुमच्या नावावर फक्त केसेस असतील
कसं होईल बहिणीचं लग्न – नरक होईल बायकोचं जगणं
कसं कराल आईचं म्हातारपण- कसं कराल बापाचं कार्य
हात रिकामा खिसे रिकामे-खिशात दमडीही नसतील
उद्या यांची पोरं विदेशात असतील
दंगल करू नका मित्रांनो तुमच्या नावावर फक्त केसेस असतील
जन्म जगण्यासाठी आहे
राजकारण्यांच्या त्या वार्ता नको
तुम्हीच सांगा तुमच्या घराला
पुरूष कोणी करता नको?
विचार करा भविष्याचा पिढ्या अंधारात बसतील
तुम्ही ठिक तर तुमच्या घरचे नेहमी आनंदी असतील
दंगल करू नका मित्रांनो तुमच्या नवावर फक्त केसेस असतील
गरिबीत राहा -स्वाभिमानाने जगा
तर लोक तुम्हाला पुसतील
जातिभेद भाषा प्रांत याने होईल सारा अशांत
समाज कंठक बनून राहाल-पोलीस घरात घुसतील
करावंस ही भोगल तुम्हीच -तेव्हा कोणी सोबत नसतील
उद्या यांची पोरं विदेशात असतील
दंगल करू नका मित्रांनो तुमच्या नावावर फक्त केसेस असतील
डॉ. उत्कर्ष शिंदे

दरम्यान, उत्कर्ष शिंदेच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी देखील कमेंट्स करत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलंय, “दादा तुमचं बरोबर आहे”, तर आणखी एका युजरने उत्कर्षच्या पोस्टवर, “नेते मंडळींची पोरं विदेशात शिकायला जातात आणि सर्वसामान्यांची पोरं दंगलीच्या केसेसमध्ये जेलमध्ये” अशी कमेंट केली आहे. “ज्या दिवशी हे आजच्या युवा पिढीला कळेल तेव्हाच खरी परिस्थिती सुधारणार” असंही एका नेटकऱ्यांनी उत्कर्षच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना लिहिलं आहे.