Famous Singer Dinkar Shinde passed away : गायक दिनकर शिंदे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. लोकप्रिय गायक व बिग बॉस फेम उत्कर्ष शिंदेने (Utkarsh Shinde) एक पोस्ट शेअर करून दिनकर शिंदे यांच्या निधनाबद्दल माहिती दिली. त्याने दिनकर शिंदेंबरोबरचा एक फोटो पोस्ट करत कॅप्शन लिहिलं. त्यात त्याने दिनकर शिंदे यांचा प्रवास सांगत आठवणींना उजाळा दिला.
दिनकर शिंदे हे प्रल्हाद शिंदे यांचे धाकटे चिरंजीव होते. उत्कर्षने इन्स्टाग्रामवर पोस्ट करून त्याच्या काकाच्या निधनाबद्दल सांगितलं.
अभिनेता राजपाल यादवची कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या
उत्कर्ष शिंदेची पोस्ट –
(गायक-दिनकर प्रल्हाद शिंदे) महागायक प्रल्हाद शिंदेंचे लहान चिरंजीव, आनंद मिलिंद शिंदेंचे (दिनू) धाकटे भाऊ आणि विजया आनंद शिंदेंचे नात्याने जरी दीर तरीही मनात स्थान मात्र पहिल्या मुलाचे. हर्षद, उत्कर्ष, आदर्शचे दिनू नाना. काका कमी पण दोस्त जास्त. नेहमी हसरा चेहरा, फुल ऑन एनर्जी, मस्त कलंदरचे आयुष्य जगलेला एक मस्त कलाकार. मी नेहमी विजया आनंद शिंदे म्हणजे माझ्या मम्मीच्या तोंडून या सर्वांचे लहानपणीचे किस्से ऐकले. कसे हे सर्व मंगळवेढे गावात एकाच वाडीत समोर रहाचे, एकाच शाळेत शिकायचे. लहानपण कसं एकत्र गेल. कसं लहानपणीच मम्मी पप्पाचं लग्न झालं. गावातून कल्याणचा प्रवास कसा झाला, गरिबी घरात होती पण ही लहान लहान मुलं किती पटापट जबाबदारीची जाण ठेवत अवेळी मोठी झाली. कसा शिंदे घराण्याचा डोलारा खांद्यावर एक एक जण घेऊ लागला. मोठा भाऊ म्हणजे बापच आणि वहिनी म्हणजे आई. हे तुमच्या कडून शिकलो दिनू नाना. भावाभावांनी आजन्म एकत्रित कसं रहायचं ते तुमच्याकडून शिकलो. आज जेव्हा मी माझ्या पुतण्याना आल्हाद हर्षद शिंदे, अंतरा आदर्श शिंदे, आलाप हर्षद शिंदे यांना खाद्यावर घेऊन मस्ती करतो तेव्हा आठवण येते तुम्हा सर्व काका लोकांची. कारण आम्हाला ही तुम्ही असेच खांद्यांवर घेऊन आम्हाला वाढवलंत. तुम्ही ही शिकवण दिलीत की पुतणे म्हणजे मित्र आपली मुलंच. म्हणून आज आल्हाद मला नाना काका नाही तर भाई म्हणतो. शिंदे घराण्याने काय कमवलं असेल तर ते असतील नाती, माणसं मित्र परिवार आणि प्रेक्षकवर्ग. मागच्या वर्षी आपला सार्थक आपल्याला सोडून गेला, त्याच्या जाण्याचे दुःख तुम्ही पचवू शकला नाहीत. एका पित्याला हे दुःख पचविणे तसे अशक्यच. तरीही तुम्ही स्वतःशी ही झुंज दिलीत. नेहमी तुमच्या चेहऱ्यावर दिसलेली ऊर्जा, हास्य आम्हाला आयुष्याला भिडण्याची कला शिकवून गेले. भावाभावातलं प्रेम, स्टेजवर तुम्ही एंट्री केली की वेगळाच कॉन्फिडन्स हे सगळं आम्ही मिस करू. तुम्हा सर्वांनाच्या संस्कारामुळेच आज हर्षद, आदर्श, उत्कर्ष एकत्रित एकमेकांची ताकत बनून सोबत आहोत, पुढे ही शिंदे घराण्याचा वट्टवृक्ष आणखी जास्त भव्य समृद्ध करू. तुम्ही आम्हाला सोडून गेलात ही वार्ता कळाली आणि तुमच्यासोबत घालविलेले लहानपणापासून ते आतापर्यंतचा प्रवास डोळ्यांसमोर उभा राहिला. दिनू नाना वी विल मिस यू, अशी पोस्ट उत्कर्षने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट करत लिहिली आहे.
दिनकर शिंदे यांच्या निधनाची बातमी कळाल्यानंतर उत्कर्षच्या या पोस्टवर अनेकजण कमेंट्स करून त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. सोशल मीडियावरही अनेकांनी पोस्ट केल्या आहेत. दिनकर शिंदे यांच्या निधनामुळे त्यांचे चाहते शोक व्यक्त करत आहेत.