Bigg Boss Marathi 5 व्या पर्वात सहभागी झालेल्या वैभव चव्हाणने २ कटिंग पॉडकास्ट (2 Cutting Podcast) ला नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने अनेक गोष्टींविषयी खुलासा केला आहे. ‘बिग बॉस मराठी ५’मधील त्याच्या खेळाविषयीदेखील तो बोलला आहे. याबरोबरच त्याने सूरज चव्हाणविषयी केलेले वक्तव्य चर्चेत आहे.

काय म्हणाला वैभव?

सूरज आणि तुझ्या वादात तुझा आक्रमकपणा जास्त वाटला, त्यामुळे प्रेक्षकांना तू नकारात्मक दिसलास. यावर बोलताना वैभवने म्हटले, “प्रत्येकाचे ट्रिगर पॉइंट असतात. आपण चांगल्या गप्पा मारतोय आणि तू अचानक माझ्या वैयक्तिक गोष्टीवरून काही बोललास तर मला राग येणार किंवा मी तुला काही बोललो तर तुला राग येणार. तसंच माझं आणि सूरजचं झालं. त्याची आणि माझी थोडी वादावादी झाली आणि त्यामध्ये तो काहीतरी मला बोलला आणि मीपण बोललो. त्याच्यात ते वाढलं सगळं. मी चिडलो होतो तेवढंच दाखवलं, तोपण बोलला होता, असं काही नाही की तो बोलत नाही. वेगळ्या गोष्टी आहेत. चॅनेलला बहुतेक त्याच्याकडून जास्त चांगल्या गोष्टी पाहिजेत, म्हणून ते तसं दाखवलं जातंय. तो चांगलाच मुलगा आहे, सूरज काही वाईट नाही, त्याच्याबद्दल वाईट सांगण्यासारखं काही नाही”, असे म्हणत वैभवने सूरज आणि त्याच्यामध्ये झालेल्या वादावर स्पष्टीकरण दिले आहे.

राहिलेल्या स्पर्धकांपैकी प्रबळ दावेदार कोण आहेत, असं तुला वाटतं? यावर बोलताना वैभव म्हणाला, “सूरज चव्हाण, अभिजीत सावंत, डीपी दादा हे मला प्रबळ दावेदार वाटतात”, असे त्याने म्हटले.

“पाठिंबा कायम राहू द्या”

याबरोबरच वैभवने म्हटले की सूरजबरोबर माझं चांगलं बॉन्डिंग होतं. ते बाहेर वेगळं दिसलं आहे, त्यावर मी स्पष्टीकरण देणार नाही. बाहेर आल्यावरदेखील त्याच्याबरोबर चांगला बॉन्ड राहील. मला हे बघायचंय, जी लोकं आता सूरज चव्हाणला हे म्हणत आहेत, की मी तुझ्याबरोबर आहे, तुझ्यासाठी हे करेन ते करेन वैगेरे, तर बोलून दाखवण्यापेक्षा तो बाहेर आल्यावर ती लोकं किती काय करतात ते मला बघायचंय. कारण त्याच्यासाठी काही प्लॅन्स माझ्या डोक्यात आहेत. मला माहितेय की त्याच्यासाठी काय करायचंय काय नाही. मी चारचौघात बोलून दाखवणार नाही. सूरजला मी सांगितेललं आहे, तो आणि मी बघून घेऊ. एकत्र बसू आणि आम्ही ठरवू. सगळ्या महाराष्ट्राने त्याला डोक्यावर घेतलंय. माझं हे म्हणणं आहे की, जेवढ्या लवकर त्याला डोक्यावर घेतलंय, तेवढ्या लवकर उतरवू नका. तेवढा पाठिंबा कायम राहू द्या. कारण त्याला काही गोष्टी लक्षात येत नाहीत, त्या लक्षात येतील.” असे वैभवने म्हटले आहे.

हेही वाचा: शिव ठाकरेला ‘बिग बॉस मराठी’ जिंकल्यावर २५ लाखांपैकी मिळालेले फक्त ‘इतके’ रुपये; यंदाच्या विजेत्याला किती मिळणार?

दरम्यान, बिग बॉस मराठीचे पाचवे पर्व लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. सध्या घरात आठ स्पर्धक आहेत. त्यापैकी कोणता स्पर्धक प्रेक्षकांचे मन जिंकत ट्रॉफीवर आपले नाव कोरणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.