Bigg Boss Marathi 5 मध्ये सहभागी होणारे स्पर्धक सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. शोमध्ये असताना जितकी त्यांची चर्चा होते, तितकेच हे स्पर्धक घराबाहेर पडल्यानंतर त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. बिग बॉसच्या घरात अरबाज निक्कीबरोबरच आणखी एका जोडीची मोठी चर्चा झाली आणि ती म्हणजे वैभव व इरिना यांची जोडी. आता वैभव चव्हाणने इरिनाबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे सध्या तो चर्चेत आला आहे.
काय म्हणाला वैभव चव्हाण?
वैभव चव्हाणने नुकतीच ‘२ कटिंग’ (2 Cutting) या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने बिग बॉस मराठीमधील त्याचा खेळ, इतर स्पर्धक यांबाबत आपली मते व्यक्त केली आहेत. त्याबरोबरच त्याने इरिनाबरोबरच्या मैत्रीबाबतही वक्तव्य केले आहे. वैभवने म्हटले, “आमच्यात ‘तसं’ काही नाही. तिचं वैयक्तिक आयुष्य वेगळं आहे. तिचा पर्सनल स्पेस वेगळा आहे. तिच्या काही गोष्टी बाहेर आहेत. माझं पर्सनल आयुष्य वेगळं आहे. नात्यात येण्याच्या दृष्टिकोनातून आमचा बॉण्ड झाला आहे, असं काही नाही. बिग बॉसच्या घरात आमचा बॉण्ड आपोआप झाला. आमच्यात जे काही होतं, ते खरं होतं.”
“आमची बॉण्डिंग, मैत्री खरी होती. बाकीच्यांना लोक विचारत होते, तुमची मैत्री खरी की खोटी, तसं आम्हाला कोणी विचारू शकत नाही. एकमेकांचा फायदा होईल काहीतरी, म्हणून आम्ही एकत्र आलो, असं झालं नाही. जेवढी खरी मैत्री ठेवता येईल तेवढी केली, जितकी करता येईल तितकी मदत आम्ही एकमेकांना केली. ती एक चांगली गोष्ट घडली बिग बॉसच्या घरात. हा बॉण्ड आणि ही मैत्री अशीच कायम राहावी, अशी माझी इच्छा आहे. बाकी पुढे आमच्यात काही नातं निर्माण व्हावं, असं मलाही वाटत नाही आणि तिलाही वाटत नाही”, असे म्हणत वैभवने इरिनाबरोबर चांगली मैत्री असल्याचे स्पष्ट केले आहे.
दरम्यान, बिग बॉस मराठीचे ५ वे पर्व ६ ऑक्टोबरला प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. सध्या घरात निक्की तांबोळी, अंकिता वालावलकर, जान्हवी किल्लेकर, धनंजय पोवार, सूरज चव्हाण, अभिजीत सावंत हे सदस्य आहेत. आता यापैकी प्रेक्षकांचे मन जिंकत कोणता स्पर्धक ट्रॉफीवर आपले नाव कोरणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.