Bigg Boss Marathi 5 वे पर्व संपले असले तरीही या पर्वात सहभागी झालेले सदस्य मोठ्या चर्चेत आहेत. मुलाखतीमध्ये केलेल्या वक्तव्यामुळे या स्पर्धकांची चर्चा होताना दिसते. आता वैभव चव्हाण(Vaibhav Chavan)ने एका मुलाखतीत अरबाज पटेलबाबत केलेले वक्तव्य चर्चेत आहे. वैभवने अरबाजला पाठीत खंजीर खुपसणारा असे म्हटले आहे.

काय म्हणाला वैभव चव्हाण?

अभिनेता वैभव चव्हाणने नुकतीच ‘गप्पा कट्टा’ या पॉडकास्टला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने अरबाज पटेलबद्दल बोलताना म्हटले, “अरबाज पटेल हा पाठीत खंजीर खुपसणारा माणूस आहे. बिग बॉसच्या घरात मी त्याला मित्रच मानायचो. त्याच्यासाठी मी कायम उभा राहिलो आहे, त्याचं ऐकलं आहे. पण त्याच्याकडून असं काही झालं नाही. जेव्हा तो बाहेर आला, तेव्हा त्याला माहित होतं की मला ट्रोल केलं जातंय. अरबाजशी तुलना करून मला बोलले जात आहे. बिग बॉसच्या घरातसुद्धा मला अरबाज २ टॅग दिला होता, त्यावेळीसुद्धा तो स्वत: कधी बोलला नाही की, भाऊ त्याला तसं म्हणू नका, त्याचे व्यक्तीमत्व वेगळे आहे. त्याने प्रेक्षकांना उद्देशूनदेखील असे कधी सांगितले नाही की, त्याला काही बोलू नका. ते सगळं तो निक्कीसाठी करत होता.”

“तो त्याचा गेम प्लॅन होता”

पुढे बोलताना वैभवने म्हटले, “मला असं वाटतं की बिग बॉसच्या घरात तू इतकं मित्र-मित्र करत होता. मी ज्यावेळी बिग बॉसच्या घराबाहेर जात होतो, त्यावेळी तू रडलास, भाऊंना म्हटलास की भाऊ आम्हाला एक संधी द्या आम्ही परत भांडतो. त्याला माहित होतं, मी त्याला बोललेलो की मी तुझ्याशी मैत्री करायला आलो नाही. तर तो म्हणायचा मी तुझ्याशी भांडूच शकत नाही. मला वाटायचं की ही मैत्री आहे, म्हणून तो तसं बोलतोय. मीसुद्धा ती मैत्री जपली. मला वाटलं ती मैत्री आहे, पण तो त्याचा गेम प्लॅन होता. मुद्दाम याच्या विरूद्ध खेळायचं नाही, असं त्यानं ठरवलेलं, असं त्याने काही मुलाखतीत म्हटलं आहे”

“बाहेर आल्यावरदेखील अरबाज कधीच असं म्हटला नाही की वैभवला तुम्ही ट्रोल करताय, त्याच्याबद्दल असं बोलू नका. मी बाहेर येताना तो जे रडला होता, ते आता खोटं वाटतंय. खरंच रडला असता तर बाहेर आल्यानंतर लगेच माझ्याशी संपर्क साधला असता. मला इन्स्टाग्रामवर फॉलो तरी केलं असतं किंवा स्वत:हून काहीतरी प्रयत्न केले असते. सगळ्यांना माहित आहे की, घराच्या आत मी एकटाच प्रयत्न करत होतो. तो काहीच करत नव्हता. बाहेर आल्यानंतर मी अपेक्षा ठेवली तर त्यात चुकीचं काय आहे. त्याने संपर्क करावा ही अपेक्षा मी ठेवूच शकतो.”

“त्यानेच जर आपल्याला धोका दिला ना तर खूप जास्त वाईट वाटतं”

याबद्दल अधिक बोलताना वैभवने म्हटले, “पाठीत खंजीर खुपसणं का म्हणतोय मी? कारण- जेव्हा आपण एखाद्याला आपलं मानतो ना, त्यानेच जर आपल्याला धोका दिला ना, तर खूप जास्त वाईट वाटतं. हे मी असं का म्हणतोय, छोटासा पॉइन्ट आहे माझा, तर संभाजी महाराजांवर आधारित माझं एक नाटक आहे. त्यामध्ये असं आहे की, गणोजी शिर्के यांनी संभाजी महाराजांना पकडून दिलेलं असतं. आपलाच माणूस आपल्या पाठीत खंजीर खुपसतो, हे यातून घडलेलं असतं.”

त्या नाटकातील एक डायलॉग आहे, “आज आम्हाला दु:ख होतं, ते फक्त एकाच गोष्टीचं. ज्या हातांनी कावेरीच्या महापात्रात घोडी घातली होती. रामेश्वरशेजारी त्रिचनापल्लीच्या गर्विष्ठ पाषाणकोटाच्या तटबंदांना सुरुंग लावले होते. पोर्तुगीजांच्या व्हॉइसरॉयला आपली जान बचावण्यासाठी होडीत बसून जीव घेऊन दूर पळायला भाग पाडलं होतं. नाथासिद्धींच्या शेपट्या तोडून त्यांना जंजीरेच्या बिळातच वळवळत ठेवलं होतं. मोकाट कुत्रे फक्त दुरुनच गुरगुरत फिरून जावे अशा औरंगजेबाच्या पाच लाख फौजेला सह्याद्रीच्या पर्वतराजीत घुसू दिलं नाही. एखाद्या किल्ल्यावरच्या भगव्या झेंड्याला हात लावायची मोघलांची हिम्मत झाली नाही. त्याच शंभूच्या पाठीत आप्तस्वकियांनी बगावतीची विखारी कट्यार घुसवावी? या शंभूनं जिंदगीभर मरणाला कधीच मोजलं नव्हतं. अरे मृत्यूच्या उंबरठ्याला अनेकवेळा ढुसण्या दिल्या पण मृत्यूलाच इतकी आमची धास्ती असायची की तो आडोशाला पळून जायचा. अरे रणांगणात मृत्यू भेटला असता तर त्याला उघड्यावर मिठी मारून जळून खाक होताना साता जन्माची धन्यता वाठली असती. पण आज मृत्यू हा असा चोरा चिलटाच्या घातकी पाऊलानं दबत-दचकत यावा, याचंच खूप दु:ख होतं”

“हे दु:ख जसं त्यांना झालं असेल ना तसं दु:ख मला झालंय”

“हे दु:ख जसं त्यांना झालं असेल ना तसं दु:ख मला झालंय की, हा माणूस ज्याच्यासाठी मी भांडतोय, ज्याच्यासाठी मी काय-काय करतोय. तो बाहेर येऊन एका शब्दाने म्हणत नाही की, वैभव माझा मित्र आहे. वैभवला तुम्ही चुकीचं समजताय. त्याचे व्यक्तीमत्व वेगळे आहे किंवा त्याचे सीन्स कट केलेले आहेत. मग तू काय कशाचा मित्र आहेस, कुठला मित्र आहेस? नको मला तुझी असली मैत्री. मी त्याला फॉलो नाही केलं, त्याला करायचं नाही करायचं त्याचा प्रश्न आहे. नकोय मला तुझी मैत्री. तू तुझ्या तुझ्या आयुष्यात खूश राहा. मला परत कधी काय भेटू नको आणि असे मित्र मला आयुष्यात नको आहेत. सरळ सरळ साधं लॉजिक आहे. मला आता माझ्या कामावर फोकस करायचे आहे”, असे वक्तव्य वैभवने अरबाजबाबत केले आहे.

हेही वाचा: ५७ व्या वर्षी दुसरं लग्न करावं का वाटलं? सिद्धार्थ चांदेकरच्या आई म्हणाल्या, “हा निर्णय घ्यायला…”

दरम्यान, बिग बॉसच्या घरात वैभव आणि अरबाजच्या मैत्रीची मोठी चर्चा झाल्याचे पाहायला मिळाले.