कलाकार म्हटलं की दिवसाचे १२-१२ तास काम करावं लागतं. बऱ्याचदा कामानिमित्त कुटुंबीयांपासून लांब राहावं लागतं, त्यामुळे सेटवरील सहकलाकार यांच्यासह कुटुंबीयांप्रमाणे नातं निर्माण होतं. कधी कधी तर ऑनस्क्रीन एकमेकांच्या विरुद्ध भूमिका साकारणारे कलाकार खऱ्या आयुष्यात मात्र एकमेकांचे जीवलग मित्र-मैत्रिणी असलेले पाहायला मिळते; तर हल्ली सर्व कलाकार अभिनयासह सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. यामार्फत ते सेटवरील गमती-जमती, घडामोडी सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात.

अशातच ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील लीला म्हणजेच अभिनेत्री वल्लरी विराज हिने सोशल मीडियावर स्टोरी शेअर केली आहे. तिने शेअर केलेल्या या स्टोरीने लक्ष वेधलं आहे, कारण यामध्ये तिने तिची सहकलाकार आलापिनीचं कौतुक केलं आहे. तिने या स्टोरीमध्ये असं म्हटलं आहे की, “जेव्हा माझी तब्येत बरी नसते तेव्हा ती माझी काळजी घेते. जेव्हा मी निराश असते तेव्हा मला हसवण्याचा प्रयत्न करते. मी थकले की माझ्या बॅगस् उचलते आणि माझ्यासाठी अशा कितीतरी गोष्टी करते; कारण तिचं माझ्यावर खूप प्रेम आहे.”

यावर आलापिनीनेदेखील तिची स्टोरी रिपोस्ट करत वल्लरीचं कौतुक केलं आहे. यामध्ये तिने म्हटलं आहे की, “तू माझ्यासाठी जे करतेस ते यापुढे काहीच नाही, त्यामुळे मला भावूक करू नकोस आणि मला माहीत आहे की, आपलं हे नातं कायम असंच राहणार आहे.”

वल्लरी व आलापिनी यांची इन्स्टाग्राम स्टोरी

सध्या वल्लरी व आलापिनी या ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेत पाहायला मिळत आहेत. यामध्ये त्या एकमेकींच्या बहिणी आहेत, तर अनेकदा त्या एकमेकींच्या पाठिशी खंबीरपणे उभ्या असलेल्या पाहायला मिळतात. मालिकेच्या शूटिंगनिमित्त दिवसभर एकत्र असल्याने दोघींची ऑफस्क्रीन मैत्री खूप चांगली झाली आहे, त्यामुळे बऱ्याचदा दोघी एकत्र असल्याचं पाहायला मिळतं.

दरम्यान, ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत सध्या मोठा ट्विस्ट आल्याचं पाहायला मिळतं. नुकतीच सुरू झालेली एजे-लीलाची प्रेमकहाणी प्रेक्षकांना आवडत असल्याचे पाहायला मिळालं, तर अशातच एकामागोमाग नवीन वळणं कथेमध्ये येताना दिसत आहेत, त्यामुळे आता या मालिकेत पुढे नेमकं काय घडणार हे पाहणं रंजक ठरेल.