‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अभिनेता राकेश बापट, वल्लरी विराज, माधुरी भारती, शर्मिला शिंदे, सानिका काशीकर, भूमिजा पाटील, भारती पाटील, प्रसाद लिमये असे अनेक कलाकार मंडळी असलेल्या या मालिकेने अल्पावधीतच मनं जिंकली. राकेश बापटने साकारलेला AJ (अभिराम जहागीरदार) व वल्लरीने साकारलेली लीला प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे.

गेल्यावर्षी १८ मार्चपासून ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिका सुरू झाली. बऱ्याच वर्षांनी या मालिकेच्या माध्यमातून राकेश बापटने मराठी मालिकाविश्वात पदार्पण केलं. या मालिकेतील नवनवीन ट्विस्टने प्रेक्षकांना खूप चांगलं खिळवून ठेवलं आहे. त्यामुळेच दिवसेंदिवस या मालिकेचा प्रेक्षक वर्ग वाढताना दिसत आहे. आज ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेला वर्ष पूर्ण झालं आहे. यानिमित्ताने लीला म्हणजेच वल्लरी विराजने खास पोस्ट लिहिली आहे.

वल्लरी विराजने ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील खास क्षण शेअर केले आहेत. हे क्षण शेअर करत तिने लिहिलं आहे, “एक वर्ष कठोर परिश्रमाचे…एक वर्ष हास्याचे…एक वर्ष या सुंदर प्रवासाचे…या एका वर्षात मला आणि माझ्या टीमला मिळालेल्या प्रेमाबद्दल धन्यवाद. हा एक छोटासा शब्द आहे. पण, आम्ही आमचे सर्वोत्कृष्ट देत राहू असं वचन देते. माझ्या टीमचे, प्रेक्षकांचे, मित्रांचे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आई-बाबांचे आभार व्यक्त मानते. कारण यांनी मला माझं काम उत्कृष्ट करण्यासाठी प्रेरणा दिली.”

वल्लरी विराजच्या पोस्टवर इतर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. “खूप अभिनंदन…खूप छान…यशस्वी भव”, “अभिलाच्या लव्हस्टोरीला १ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने अभिनंदन”, “मस्त वल्लरी”, “‘नवरी मिळे हिटलरला’च्या टीमचं अभिनंदन”, अशा प्रतिक्रिया चाहत्यांच्या उमटल्या आहेत. दरम्यान, लवकरच ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत एजेची पहिली पत्नी अंतराची एन्ट्री होणार आहे. तिच्या एन्ट्रीनंतर मालिकेत बरंच काही घडणार आहे. अंतराचा मृत्यू झाला असून ती जिवंत कशी काय? आणि ती आता पुन्हा का आली? या प्रश्नांची उत्तरं येत्या काळात मिळणार आहेत.