अभिनेत्री वल्लरी विराज(Vallari Viraj) ‘कन्नी’, ‘मैं लडेगा’, अशा चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. याबरोबरच, ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ या मालिकेतील तिच्या भूमिकेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. मात्र, ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेतून वल्लरी विराजला एक वेगळी ओळख, मोठी लोकप्रियता मिळाली. नवरी मिळे हिटलरला या मालिकेत वल्लरी विराज प्रमुख भूमिकेत दिसत आहे. वेंधळी, गोंधळ घालणारी, थोडी हट्टी, बालिश, पण तितकीच प्रेमळ व धाडसी लीलाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यास सुरुवात केली आहे. मालिकेतील एजे-लीलाची जोडी सर्वांनाच भूरळ घालत असल्याचे दिसते. मालिकेत सध्या एजे व लीला काश्मीरमध्ये गेल्याचे पाहायला मिळत आहे. आता तिथे गेल्यानंतर त्यांच्या मालिकेचे शूटिंग कसे झाले, हे दाखवणारा एक व्हिडीओ अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अभिनेत्री वल्लरी विराजने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये काश्मीरमधील थंड वातावरणात कलाकारांनी कसे शूटिंग केले हे पाहायला मिळत आहे. वल्लरी विराजबरोबर अभिनेता राकेश बापटही यामध्ये दिसत आहे. बर्फाळ प्रदेशात, थंड वातावरणात या कलाकारांनी शूटिंग केले आहे. या व्हिडीओमध्ये वल्लरीला थंडी वाजल्याने तिला तिच्या टीममधून जॅकेट आणून दिल्याचे दिसत आहे. तरीही या वातावरणात या कलाकारांनी हे शूटिंग पूर्ण करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. लीलाने या शूटिंगवेळी लाल रंगाची साडी नेसली आहे. काही डान्सचे सीन पाहायला मिळत आहेत. या व्हिडीओमध्ये ‘तुम क्या मिले’ हे गाणे ऐकायला मिळत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना वल्लरीने, “अजूनही थंडी जाणवते”, अशी कॅप्शन दिली आहे.

अभिनेत्रीने शेअर केलेल्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करीत वल्लरी विराज व राकेश बापट यांचे कौतुक केले आहे. एका नेटकऱ्याने लिहिले, “लीला तू ग्रेट आहेस, इतक्या थंडीत डान्स करणे सोपे नाही”, दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले “दोन-तीन डिग्रीमध्ये स्वेटर, जॅकेटशिवाय राहणे खरंच कठीण आहे, लीला तुला मानलं पाहिजे”, आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “लीला हे खूप आव्हानात्मक होते व सुंदरही होते”, “तू खूप मजबूत आहेस, इतक्या थंडीत डान्स करण्यासाठी मजबूत शरीर व हृदय असावे लागते.”

एका चाहत्याने मालिकेचे कौतुक करत लिहिले, “खरंच प्रेक्षकांना एक ग्रँड प्रपोजल पाहता यावं, एजे-लीलाच्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाचा क्षण कायम प्रेक्षकांच्या आठवणीत रहावा, अविस्मरणीय व्हावा यासाठी खरंच वल्लरी आणि संपूर्ण नवरी मिळे हिटलरच्या टीमने खूप त्रास सहन करत हा सीन इतका सुंदर शूट केला. हा सीन पाहताना आपसुकच डोळ्यांत पाणी आलं.”

दरम्यान, नुकत्याच समोर आलेल्या एका प्रोमोमध्ये लीलाला गोळी लागल्याचे पाहायला मिळाले. आता मालिकेत पुढे काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अभिनेत्री वल्लरी विराज अनेकदा शूटिंगदरम्यानचे व्हिडीओ शेअर करताना दिसते. तिच्या सोशल मीडियावरील व्हिडीओंना प्रेक्षकांचीदेखील पसंती मिळताना दिसते.