पडद्यावर दिसणारे कलाकार सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातूनदेखील प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसतात. अनेकदा हे कलाकार त्यांच्या आयुष्यातील खास, महत्त्वाचे, सुंदर क्षण चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. काही वेळा डान्स, विनोदी रील्स, नवनवीन ठिकाणचे व्हिडीओ अशा माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात. पडद्यावर दिसणाऱ्या कलाकृतीला जितका प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतो, तितकाच प्रतिसाद सोशल मीडियावरील या कलाकारांच्या कंटेंटला मिळताना दिसतो. आता ‘नवरी मिळे हिटलरला'(Navri Mile Hitlarla) मालिकेतील लीला व सरू तसेच ‘शिवा'(Shiva) मालिकेतील शिवा या तिघींनी एकत्र एक डान्स केला असून हा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.
सहकलाकारांनी केले कौतुक
अभिनेत्री वल्लरी विराजने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये वल्लरीसह अभिनेत्री पूर्वा कौशिक व भूमिजा पाटील दिसत आहे. या तीन अभिनेत्रींनी इश्क चित्रपटातील ‘मिस्टर लोवा लोवा’ (Mr. Lova Lova) या गाण्यावर डान्स केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना वल्लरीने हे खूप दिवसांपासून बाकी होते, अशा आशयाची कॅप्शन दिली आहे. याबरोबरच अभिनेत्री भूमिजा पाटील व पूर्वा कौशिकला टॅग केले आहे. या व्हिडीओवर चाहत्यांसह सहकलाकरांनीदेखील कमेंट करत या अभिनेत्रींचे कौतुक केले आहे. ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत लीलाच्या बहिणीची रेवतीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीने आलापिनीने ‘वाह’ म्हणत कौतुक केले आहे. शिवाच्या बहिणीची दिव्याची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीने सृष्टीनेदेखील त्यांचे कौतुक केले आहे. याबरोबरच, पूर्वाने सृष्टीला टॅग करत या दोघींनी काल तुझी आठवण काढली होती असे म्हटले.
अनेक चाहत्यांनी अभिनेत्रींचे कौतुक केल्याचे कमेंट्समध्ये दिसत आहे. “या तीन मुली सुपरस्टार आहेत”, “खूप सुंदर”, “मस्त”, अशा अनेक कमेंट्स केल्या आहेत; तर अनेकांनी हार्ट इमोजी शेअर करत प्रेम व्यक्त केले आहे.
‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत भूमिजा पाटीलने सरस्वती ही भूमिका साकारली आहे, तर वल्लरी विराज या मालिकेत लीला ही भूमिका निभावताना दिसत आहे. लीला ही सरस्वतीची सासू आहे. सध्या या मालिकेत एजेला तो लीलाच्या प्रेमात पडल्याची जाणीव झाल्याचे पाहायला मिळत आहे. लीला व एजेची केमिस्ट्री प्रेक्षकांना भूरळ घालते, तर सासू-सुनांमधील छोटी-मोठी भांडणे प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतात. ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.
‘शिवा’ मालिकेत अभिनेत्री पूर्वा कौशिकने शिवा ही भूमिका साकारली आहे. शिवा तिच्या अनोख्या स्टाइलने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना दिसते. सध्या या मालिकेत आशू व शिवा यांच्यात दुरावा आल्याचे दिसत आहे. आता आशूच्या मनातील शिवाविषयीचे गैरसमज कधी दूर होणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
दरम्यान, ‘नवरी मिळे हिटलरला’ व ‘शिवा’ या दोन्ही मालिकेतील कलाकार सोशल मीडियावर रील्सच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतात.