Varad Chawan : दिवंगत अभिनेते विजय चव्हाण यांनी विविधांगी भूमिका साकारून कायम प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. ‘मोरूची मावशी’, ‘श्रीमंत दामोदरपंत’ या नाटकांमध्ये त्यांनी साकारलेल्या भूमिका प्रचंड गाजल्या होत्या. सध्या विजय चव्हाण यांचा मुलगा वरद चव्हाण सर्वत्र चर्चेत आहे. नुकत्याच ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत वरदने त्याला गेल्या दोन वर्षांपासून इंडस्ट्रीत काम मिळत नसल्याचा अनुभव सांगितला. याशिवाय चित्रपटांमध्ये काम करताना लक्षात राहिलेल्या काही धक्कादायक आठवणी सुद्धा त्याने यावेळी सांगितल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वरद चव्हाण म्हणाला, “एका सिनेमामध्ये मी आतंकवाद्याची भूमिका करत होतो. माझे बाबा सुद्धा त्या सिनेमात होते. त्या चित्रपटात एक क्लायमॅक्सचा सीन होता. ज्यात मुख्य पोलीस अधिकारी आतंकवाद्याच्या म्हणजेच माझ्या कानाखाली मारतात असा प्रसंग होता. त्या सिनेमाचे जे दिग्दर्शक होते, त्यांनी अभिनेत्याला सांगितलं खरी थोबाडीत मार आणि समोरच्या माणसाने मला जे काही मारलंय… माझ्या आई-बाबांनी सुद्धा मला असं कधी मारलं नव्हतं. त्यामुळे माझं असं झालं… ठिके एक योग्य शॉट मिळाला. हे आपलं काम आहे. पण, नंतर तोच सीन टू-शॉटमध्ये चित्रित करायचा होता. त्यामुळे पुन्हा मला कानाखाली मारली. मग काही वेळाने, तिसरी कानाखाली बसली. ओएसमध्ये माझा अर्धा गालच दिसत होता…त्यामुळे मारताना ते सहज चीट करू शकत होते पण, तसं नाही झालं. पहाटेचे साडेचार वाजले होते. बाबा सुद्धा सेटवर होते…मी प्रत्येक थोबाडीत खातोय, बाबांकडे पाहतोय… माझं असं झालं की, जर तुम्ही माझ्या जागी असता तर, या दिग्दर्शकाने असं करण्याची ऑर्डर दिली असती का? मला काहीच कळत नव्हतं.”

हेही वाचा : मराठमोळ्या अभिनेत्रीसह २२ वर्षांपासून लिव्ह इनमध्ये राहतोय अभिनेता; लग्नाबद्दल म्हणाला, “मी कायम माझ्या…”

वरद पुढे म्हणाला, “पाचव्यांदा मला थोबाडीत मारण्यात आलं… समोरचे अभिनेते मला प्रत्येक शॉटनंतर सॉरी बोलत होते. पण, त्या सॉरीला अर्थ नाहीये ना… कारण, एकदा मास्टरमध्ये तुम्ही पूर्ण फोर्सने थोबाडीत मारल्यावर बाकीच्या शॉटमध्ये इतकी ताकद वापरण्याची गरज नसते. पण, आपण खरंच एखाद्या आतंकवाद्याला पकडलंय आणि आता याला थोबडवायचं आहे याच विचाराने त्यांनी मला पाच वेळा मारलं. पाचव्यांदा मारल्यावर ते अभिनेते मला म्हणाले, वरद खरंच सॉरी…माझी इच्छा नाहीये. पण, त्यांनी सांगितलंय तर मी काय करणार?”

हेही वाचा : “फर्निचरचं दुकान चालवण्यासाठी सर्वसामान्यांची फसवणूक…” म्हणणाऱ्यावर धनंजय पोवार भडकला, म्हणाला, “किती घाणेरडी वृत्ती…”

सीन संपल्यावर वडिलांना विचारला होता ‘तो’ प्रश्न

“माझा गाल सुजला होता, मुंग्या आलेल्या…मी पटकन त्यांना म्हणालो होतो, सर तुम्ही एका शॉटसाठी मला पाचवेळा मारलं कधी अशी वेळ येऊ नये की, शॉटसाठी मला तुम्हाला एकदा थोबाडीत मारावी लागेल. कारण, ते तुम्हाला सहन होणार नाही. खरंतर ते सिनिअर असल्याने मी हे बोलणं योग्य नव्हतं. पण, त्या पाच कानाखाली खाल्ल्यावर माझ्या तोंडून ते निघालं. त्या प्रसंगानंतर माझी झोप उडाली होती… घरी जाताना मी बाबांना गाडीत तेच म्हणालो, बाबा याबद्दल तुम्ही बोलायला पाहिजे होतं. कारण, मी माझ्या मुलासाठी नक्कीच उभा राहिलो असतो. तुम्ही माझ्यासाठी का उभे नाही राहिलात? असा प्रश्न वरदने विजय चव्हाण यांना विचारला होता.” असे अनेक अनुभव या इंडस्ट्रीत काम करताना आले असल्याचं अभिनेत्याने यावेळी सांगितलं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Varad chawan reveals shocking incident said get unnecessary slap during movie shoots sva 00