Bigg Boss Marathi 5 व्या पर्वात पहिल्याच आठवड्यात झालेला वाद प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे. निक्की तांबोळी आणि वर्षा उसगांवकर यांच्यातील तो वाद होता. निक्कीने वर्षा उसगांवकरांचा अपमान केल्याने सोशल मीडियावर प्रेक्षकांच्या संतप्त प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. अनेक कलाकारांनीदेखील व्यक्त होत निक्कीविषयी परखड शब्दात मत व्यक्त केले होते. वर्षा उसगांवकर नुकत्याच बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्या आहेत. बाहेर आल्यानंतर त्यांनी एका मुलाखतीदरम्यान यावर वक्तव्य केले आहे.

काय म्हणाल्या वर्षा उसगांवकर?

अभिनेत्री वर्षा उसगांवकरांनी नुकतीच ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली. पहिल्या दिवसापासून निक्की घरातील कामं करत नाही, जेष्ठ कलाकारांचा अपमान करते असे मुद्दे चर्चेत होते. यावर तुमचं मत काय? या प्रश्नाचे उत्तर देताना वर्षा उसगांवकरांनी म्हटले, “घरात जातानाच मला रितेशजींनी विचारलं होतं की तुम्हाला वर्षा उसगांवकर म्हणून काय अपेक्षा आहे? मी म्हटलं, वर्षा उसगांवकर म्हणून नाही तर कोरी पाटी करूनच जाणार आहे. कारण- आज जरी माझ्या नावाचं वलय माझ्या कामी येत असेल तरी एकदा खेळ सुरू झाला की मी इतरांच्या बरोबरीचीच होऊन जाणार आहे. मी त्यांना इतकच म्हटलेलं की मी सगळ्यांपेक्षा मोठी असेन, फक्त एवढाच मान मला मिळाला पाहिजे, असं मला वाटतं. बाहेरच्या आयुष्यात जेव्हा जेष्ठ व्यक्ती आपल्या आजूबाजूला असते तेव्हा आपण तिला तिच्या वयाचा मान देतो. तेवढीच माझी अपेक्षा आहे.”

पुढे वर्षा उसगांवकरांनी म्हटले, “जेव्हा तिने मला ‘तुम्ही तंगड्या वर करून झोपलात’, असं म्हटले ते मला निश्चित खटकलं आणि मला असं वाटलं की ही मुलगी काय बोलतेय? आणि शब्दश: मी तशी झोपले असते तर गोष्ट वेगळी होती. मी फक्त बसून उठले, त्याचा एवढा तिने विपर्यास करायचा आणि अशा प्रकारची भाषा वापरायची, हे निश्चितच खटकलं. वर्षा उसगांवकर म्हणून नाही तर एक जेष्ठ व्यक्ती म्हणून मला ते आवडलं नाही.”

हेही वाचा: Bigg Boss Marathi 5: ग्रँड फिनालेचा विजेता ठरवण्यासाठी आवडत्या स्पर्धकाला वोटिंग कसे करायचे? जाणून घ्या

दरम्यान, वर्षा उसगांवकर शोच्या शेवटच्या टप्प्यात घराबाहेर पडल्या आहेत. आता बिग बॉसच्या घरात सूरज चव्हाण, अभिजीत सावंत, निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेकर, अंकिता वालावलकर आणि धनंजय पोवार हे सदस्य आहेत. आता यापैकी कोणता सदस्य घराबाहेर पडणार आणि कोणता सदस्य प्रेक्षकांचे मन जिंकत ट्रॉफी आपल्या नावावर करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.