Bigg Boss Marathi 5 च्या घरातून वर्षा उसगांवकर नुकत्याच बाहेर पडल्या आहेत. शोमधून बाहेर पडल्यानंतर वर्षा उसगांवकरांनी बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांबद्दल अनेक खुलासे केले आहेत. त्यांनी एका मुलाखतीत कोणत्या गोष्टीची खंत आहे, असे म्हटले आहे.

काय म्हणाल्या वर्षा उसगांवकर?

अभिनेत्री वर्षा उसगांवकरांनी ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत वर्षा उसगांवकर यांनी म्हटले, “मला आता छान मोकळं वाटतंय. बिग बॉसच्या घरात नाही म्हटलं तरी दडपण असतं, तर आता त्या दडपणाखाली मी निश्चितच नाही. परफॉर्मन्सचं दडपण असतंच, आपला खेळ प्रत्येक दिवशी चांगला असलाच पाहिजे. आपण काहीतरी कटेंट देऊ शकलो पाहिजे. पण, काहीतरी निरर्थक कटेंट देण्यात काही अर्थ नव्हता, त्यामुळे मी तसं कधी केलं नाही. त्यामुळे आता चांगलं वाटतंय पण अर्थात मला खंत आहे की, मी फायनलिस्ट होऊ शकले नाही. कारण मी जिंकण्याच्या ईर्षेने गेले होते. बरं जिंकले नाही तरीसुद्धा फायनलिस्ट होणं, माझ्यासाठी खूप महत्वाचं होतं आणि ते राहून गेलं. कोणत्याही एखाद्या मॅचमधून एखादा खेळाडू परत जातो तेव्हा असं वाटतं की हाता-तोंडाशी आलेला घास गेला. तसंच मला आता वाटत आहे.”

तुम्ही घरात शांतपणे खेळलात, कधी तलवार काढावी, शांतपणे खेळणं बंद करावं असं कधी वाटलं का? यावर वर्षा उसगांवकरांनी म्हटले, “असं मला कधीच वाटलं नाही. का कोणास ठाऊक? घरातील बऱ्याच सदस्यांना आवाजाची देणगी आहे. धनंजय आहे, तो कोकलतच असतो. निक्कीसुद्धा तशीच आहे. आणखी बऱ्याच जणांना तशीच सवय आहे. त्यामुळे कधी कधी अशी खंत वाटायची की आपला आवाज जरा चढा असता, तर तलवार काढायला उपयोग झाला असता. पण माझी ती देहबोलीच नाहीये मुळात. ती नाहीये तर कुठून आणू. करू शकले असते पण तो अभिर्भाव झाला असता. तसं केलं असतं तर ते नाटक वाटलं असतं, असं मला वाटतं”, असे वर्षा उसगांवकरांनी म्हटले आहे.

हेही वाचा: आयुष्यात सुनीता असूनही ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीच्या प्रेमात पडलेला गोविंदा, रागात साखरपुडाही मोडला होता अन्…

दरम्यान, बिग बॉसचे पाचवे पर्व शेवटच्या टप्प्यात आहे. ६ ऑक्टोबरला ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा महाअंतिम सोहळा आहे. आता कोणता स्पर्धक जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.