अभिनेता हर्षद अतकरी व अभिनेत्री शर्वरी जोग यांची प्रमुख भूमिका असलेली ‘कुन्या राजाची गं तू रानी’ मालिका काही महिन्यांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीस आली. छोट्याशा गावातल्या गुंजाची प्रेरणादायी गोष्ट सांगणाऱ्या या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली. विशेष म्हणजे कबीर व गुंजा ही जोडी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. त्यामुळे मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. टीआरपीच्या शर्यतीतही मालिका मागे नाही. पण अशा लोकप्रिय मालिकेतील एका अभिनेत्रीने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.
१८ जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या ‘कुन्या राजाची गं तू राणी’ या मालिकेत हर्षद व शर्वरी व्यतिरिक्त पूर्णिमा डे, समिधा गुरू, राजन भिसे, नीता पेंडसे, प्रियंका नार, तनिष्का म्हाडसे, संजय खापरे अशी बरीच तगडी कलाकार मंडळी आहेत. याच कलाकार मंडळीतील एका अभिनेत्रीची मालिकेतून एक्झिट झाली आहे. पण ही एक्झिट कोणत्या कारणामुळे झाली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण या अभिनेत्रीच्या एक्झिटनंतर नव्या कलाकाराची एंट्री झाली आहे.
जुन्या खाष्ट विचारांची, लोभी, संधीसाधू, गुंजाला आणि बाभळीला प्रचंड त्रास देणारी, कट कारस्थानी असलेल्या कडू आजीची भूमिका साकारलेली अभिनेत्री वसुधा देशपांडे यांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. आता कडू आजीच्या भूमिकेत लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर झळकणार आहेत.
हेही वाचा – Bigg Boss 17: अंकिता लोखंडे सुशांत सिंह राजपूतच्या आठवणीत झाली भावुक; म्हणाली, “तो खूप…”
दरम्यान, यापूर्वीही सविता मालपेकर ‘स्टार प्रवाह’वरील मालिकेत झळकल्या होत्या. ‘मुलगी झाली हो’ या लोकप्रिय मालिकेतही त्यांनी दमयंती पाटील (आजी) ही भूमिका साकारली होती. सविता मालपेकर यांची ही भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली होती.