अभिनयाच्या क्षेत्रात काही दिवसांपूर्वीच एक धक्कादायक बातमी समोर आली होती. संपत्तीसाठी टीव्ही अभिनेत्री वीणा कपूर यांच्या मुलाने त्यांची हत्या केल्याचं वृत्त पसरल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला होता. पण आता या हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. ज्या अभिनेत्रीच्या निधनाचं वृत्त सगळीकडे पसरलं होतं तिने स्वतःच पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली आहे. तसेच आपण जिवंत असल्याची माहिती दिली आहे.
निधन झालेल्या महिलेनं अशाप्रकारे पोलिसांत तक्रार दाखल करणं ऐकायला विचित्र वाटत असलं तरी खरंच असं झालं आहे. पण नेमकं काय घडलं तर, काही दिवसांपूर्वी हत्या झालेली महिला या अभिनेत्री वीणा कपूर नव्हत्या तर जुहू भागात राहणाऱ्या एक महिला होत्या ज्यांचं नाव वीणा कपूर होतं. त्यांचा मुलगा सचिन कपूरने त्यांची हत्या केली होती. दोघींचीही नावं एकसारखी असल्याने गोंधळ उडाला आणि मृत महिला या अभिनेत्री वीणा कपूर असल्याचं वृत्त पसरलं होतं.
आणखी वाचा-प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता डीजे स्टीफन बॉसची आत्महत्या, गोळी झाडून संपवलं जीवन
निधनाची बातमी प्रसारित झाल्यानंतर सोशल मीडियावर लोकांनी अभिनेत्रीला श्रद्धांजली देण्यास सुरुवात केली. एवढंच नाही तर त्यांच्या मुलालाही सोशल मीडियावर बरंच ट्रोल करण्यात आलं. आता अभिनेत्री वीणा कपूर यांनी पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात तक्रार दाखल केली असून याप्रकरणी पोलीस तपास सुरू करण्यात आला आहे.
अभिनेत्री वीणा कपूर यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल करताना सांगितलं की, “मी जिवंत आहे मात्र माझ्याबद्दल सोशल मीडियावर चुकीचं वृत्त पसरवलं जात आहे. सोशल मीडियावर मला श्रद्धांजली देण्यात आली आणि माझ्या मुलालाही अपमानित करण्यात आलं आहे. यामुळे आमच्या कुटुंबाला त्रास सहन करावा लागला आहे.”
आणखी वाचा- महेश मांजरेकरांवर गुन्हा दाखल, बदनामी करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी चौकशीचे आदेश
‘मिड- डे’शी बोलताना वीणा कपूर म्हणाल्या, “मी खूप त्रासले आहे. माझे फोटो व्हायरल झाले आहेत. मला लोक श्रद्धांजली देत आहेत. लोकांचे फोन येत आहेत. मला माझ्या कामावरही लक्ष देता येत नाही आहे. त्यामुळे आता मी सर्वांना सांगू इच्छिते की माझ्या मुलाने माझी हत्या केलेली नाही. मी जिवंत आहे आणि माझ्या निधनाची वृत्त ही केवळ अफवा आहेत. या खोट्या अफवांमुळे मला काम मिळणं बंद झालं आहे.”