‘बिग बॉस’च्या घरात अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन यांच्या नात्यातील चढ-उतार पाहायला मिळत आहेत. खासकरून अंकिता व विकीची आई फॅमिली वीकमध्ये शोमध्ये येऊन गेल्यापासून त्यांच्या नात्यात तणाव पाहायला मिळत आहे. आता ‘वीकेंड का वार’ भागात अंकिताने तिची सासू रंजना जैन यांच्याशी झालेल्या संभाषणाबद्दल काही खुलासे केले आहेत.
मागील एपिसोडमध्ये असं दिसून आलं होतं की विकीच्या वडिलांनी अंकिताची आई वंदना लोखंडे यांना फोन केला होता. अंकिताने विक्कीवर चपल फेकली होती त्याचा उल्लेख करत त्यांनी तुम्ही तुमच्या पतीला अशा चपल मारायच्या का? असं विचारलं होतं. याबद्दल अंकिता व विकी एकमेकांशी बोलताना दिसले.
“तुला माझ्यावर विश्वास नाही का?” असं अंकिताने विकीला विचारलं. मग ती म्हणाली, “माझ्या आईला तुझ्या वडिलांनी फोन केला होता. ते तिला म्हणाले, ‘तुम्ही तुमच्या पतीला असे चपल व बूट फेकून मारत होता का?’ इतकंच नाही तर ते तिला म्हणाले की ‘तुमची लायकी काय आहे?’ मी तुझ्या आईला बोलले की माझ्या बाबांचं निधन झालंय. माझी आई एकटीच आहे. मी जे केलं, त्यासाठी मी माफी मागतेय. पण नंतर मला माझ्या आईने सांगितलं की तुझे बाबा बऱ्याच गोष्टी बोलले. पण मी तिला म्हटलं की हे सगळं इथे बोलू नकोस.”
यावर विकीने त्याच्या वडिलांच्या कृतीचा बचाव केला आणि म्हणाला, “तुझे वडील असते तर काय म्हणाले असते? त्यांनाही हे आवडलं नसतं. त्यांनीही ते कोणत्या ना कोणत्या प्रकारे बोलून दाखवलं असतं ना?” यानंतर दोघेही या विषयावर बोलत होते. पुढे विकीने अंकिताला विचारलं, “माझे कुटुंब तुझ्या करिअरमध्ये, आपल्या आयुष्यात किंवा तू काय घालतेस आणि तू कशी राहतेस यात कधी हस्तक्षेप करते का?” अंकिताने नकार दिला पण पुढे म्हणाली, “आपल्या आईंनी आपल्याला असं भांडताना पाहिलं नाही त्यामुळे त्यांच्यावर परिणाम होत असावा. तुझ्या घरात मला खूप आदर आणि प्रेम मिळालं आहे. इथल्या भांडणामुळे मला ते गमवायचं नाही म्हणूनच मी माफी मागत आहे. मी हजार वेळा सॉरी म्हणायला तयार आहे.”
अंकिता व विकीच्या लग्नाला दोन वर्षे झाली आहेत. त्यांनी डिसेंबर २०२१ मध्ये लग्न केलं होतं. त्यापूर्वी अंकिता दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतबरोबर रिलेशनशिपमध्ये होते.