नाटकाचा चंदेरी रंगमंच असो वा चित्रपटाचा सोनेरी पडदा… आपल्या दमदार अभिनयानं मराठीसह हिंदी प्रेक्षकांचंही मनोरंजन करणारे अभिनयातले सम्राट म्हणजेच पद्मश्री व महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ. अशोक सराफ यांनी आजवर नाटके व चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. त्यांचा अभिनय क्षेत्रातला अनुभव व व्यासंग पाहता, प्रत्येक कलाकाराची त्यांच्याबरोबर काम करण्याची इच्छा असते आणि एका मराठी अभिनेत्रीची हीच इच्छा पूर्ण झाली आहे.
अभिनेत्री विदिशा म्हसकरची (Vidisha Mhaskar) अशोक सराफ (Ashok Saraf) यांच्याबरोबर काम करण्याची इच्छा पूर्ण झाली आहे. त्यानिमित्त तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीत आनंद व्यक्त केला आहे. विधिशा सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती आपले अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करीत असते. त्याशिवाय ती कामानिमित्तची माहितीही शेअर करीत असते. अशातच तिने अशोक सराफ यांच्याबरोबर काम करण्याचा आनंद व्यक्त करणारी पोस्ट शेअर केली आहे.
विदिशाने इन्स्टाग्राम स्टोरीवर अशोक सराफांबरोबरचा फोटो शेअर केला आणि असं म्हटलं आहे, “अशोक मा.मा. या दिग्गज अभिनेत्याबरोबर स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळाली”. विधिशाने शेअर केलेल्या या फोटोमध्ये अशोक सराफ यांच्या हातात स्क्रिप्ट (संहिता) असल्याचे पाहायला मिळत आहे आणि विदिशा त्यांच्या स्क्रिप्टमध्ये हळूच डोकावत आहे. त्यांच्याबरोबर काम करतानाचा आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसत आहे.

‘अशोक मा.मा.’ व ‘पिंगा गं पोरी पिंगा’ या मालिकांच्या महासंगमाचा विशेष भाग होणार आहे आणि त्या भागानिमित्त विधिशाची अशोक सराफ यांच्याबरोबर काम करण्याची इच्छा पूर्ण झाली आहे. ‘अशोक मा.मा.’ व ‘पिंगा गं पोरी पिंगा’ या मालिकांचा महासंगम असलेल्या विशेष भागात अशोक मा. मा. ‘पिंगा गर्ल्स’च्या मदतीला धावून जाणार आहेत. थोड्या वेळापुर्वी महासंगम विशेष प्रोमो शेअर करण्यात आला.
दरम्यान, ‘पिंगा गं पोरी पिंगा’ या मालिकेत ऐश्वर्या शेटे, आकांक्षा गाडे, शाश्वती पिंपळीकर, प्राजक्ता परब व विदिशा म्हसकर या अभिनेत्री प्रमुख भूमिकांत आहेत. येत्या २४ मार्च रोजी दुपारी १ आणि संध्याकाळी ७ वाजता या दोन्ही मालिकांचा महासंगम प्रेक्षकांना पाहता येणार आहे.