सोशल मीडिया हे माणसाच्या रोजच्या जीवनातील एक महत्त्वाचे माध्यम बनले आहे. सामान्यांपासून ते संपूर्ण जगातील प्रसिद्ध, श्रीमंत व्यक्तींपर्यंत सर्व जण सोशल मीडियाचा करताना दिसतात. आता एआय तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे अनेकविध प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळतात. अनेकदा त्यामुळे फसवणूकदेखील होते. मोठमोठ्या प्रसिद्ध कलाकारांचे चेहरे एखाद्या उत्पादनाची जाहिरात करताना दिसतात. आता असाच काहीसा प्रकार अभिनेत्री विद्या बालन(Vidya Balan)बरोबर घडल्याचे पाहायला मिळाले. अभिनेत्रीने स्वत: सोशल मीडियावर याची माहिती दिली आहे.

बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालनने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्याबरोबरच त्या व्हिडीओबद्दल तिने माहितीदेखील लिहिली आहे. विद्या बाललने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती स्वत: दिसत आहे. त्यामध्ये ती म्हणते, “नमस्कार, मी तुमची आवडती विद्या बालन आहे. आज मी तुम्हाला…”, असे दिसत आहे. त्यावर लाल रंगांनी फुली मारून ‘स्कॅम अलर्ट’, असे लिहिले आहे. हा व्हिडीओ शेअर करताना विद्या बालनने लिहिले, “सध्या सोशल मीडियावर व व्हॉट्सअपवर अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये मी दिसत आहे. मला हे स्पष्ट करायचे आहे की, हे व्हिडीओ एआय निर्मित असून अनधिकृत आहेत. माझा या व्हिडीओंशी काहीही संबंध नाही. या व्हिडीओंच्या प्रसारात माझा काहीही सहभाग नाहीये. या कंटेटला मी समर्थन देत नाही. माझी सर्वांना विनंती आहे की, हे व्हिडीओ शेअर करण्याआधी त्यामध्ये असलेल्या माहितीची पडताळणी करा. तसेच एआयने निर्माण केलेल्या दिशाभूल करणाऱ्या या व्हिडीओंपासून सावध राहा”, असे म्हणत अभिनेत्रीने सोशल मीडियावरील काही व्हिडीओंमध्ये ती दिसत असून, ते एआयने बनवले गेले आहेत, त्यापासून सावध राहा, असा इशारा दिला आहे.

विद्या बालनच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी याबद्दल माहिती दिल्याबद्दल तिला धन्यवाद, म्हटले आहे. एका चाहत्याने म्हटले की, हे जवळजवळ सर्व अभिनेत्रींबरोबर होत आहे. दुसऱ्या एकाने म्हटले की, मी विचार केला की, हा व्हिडीओ खरा आहे; तर काहींनी, सरकारने यावर काहीतरी कारवाई केली पाहिजे, असे म्हटले आहे.

दरम्यान, विद्या बालन ही तिच्या अभिनयासाठी ओळखली जाते. अनेक गाजलेल्या चित्रपटांत अभिनेत्री प्रमुख भूमिकांत दिसली होती. सोशल मीडियावरही ती मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. विविध गाण्यांवर डान्स किंवा रील्समध्ये अभिनय करून, ती प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसते. ती अनेक विनोदी रील्समधून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेते. विद्या बालन नुकतीच ‘भूल भुल्लैय्या ३’मध्ये दिसली होती.

Story img Loader