मराठी अभिनयसृष्टीतील आघाडीच्या व दिग्गज अभिनेत्री व अशोक सराफ यांच्या पत्नी निवेदिता सराफ अनेक विषयांवर त्यांची मतं मांडत असतात. नुकतीच त्यांनी एक मुलाखत दिली. त्या मुलाखतीत त्यांनी नाट्यगृहांमधील अस्वच्छतेचा मुद्दा उचलून धरला आणि नाट्यगृहे खासगी ट्रस्टना चालवायला द्यावी असे विधान केले. त्यावर अभिनेत्री विशाखा सुभेदारने प्रतिक्रिया दिली आहे.
वनाधिकाऱ्यांनी ‘बिग बॉस’च्या घरातून स्पर्धकाला केली अटक, ‘ते’ पेंडंट ठरलं कारणीभूत
निवेदिता सराफ काय म्हणाल्या होत्या?
“नाट्यगृहांच्या परिस्थितीमध्ये कोणतीही सुधारणा झालेली नाही. नाट्यगृहांमध्ये महिलांच्या खोलीत बाथरुम नाहीये. मासिक पाळीदरम्यान महिलांनी काय करायचं? त्यांचा विचारच केला जात नाही. बऱ्याचदा शासकीय कार्यक्रमांना नाट्यगृह दिली जातात. ते शासकीय कार्यक्रम लांबतच जातात. पुण्यातील बालगंधर्वसारख्या नाटयगृहातील नाटकांना लांबून माणसं आलेली असतात. त्यात वयोवृद्धही असतात. आधी कार्यक्रम संपेपर्यंत दरवाजा उघडत नाही. बाहेर बसायला जागा नाही. कुठे बसणार ती माणसं? बाथरुमला कुठे जाणार? अनेकदा आम्हीही बाहेर ताटकळत उभे असतो. आम्हाला मेकअप रुम मिळत नाहीत. एखाद्या वेळेत सुरु झालेला कार्यक्रम ठरलेल्या वेळेतच संपवण्याची सवय आपल्याला अजूनही लागलेली नाही. त्यामुळे सगळी नाट्यगृहे खासगी ट्रस्टला देण्याची खूप गरज आहे,” असं निवेदिता सौमित्र पोटे यांच्या ‘मित्र म्हणे’ यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत म्हणाल्या होत्या.
“मासिक पाळीदरम्यान…” नाट्यगृहांच्या अवस्थेवरुन निवेदिता सराफ भडकल्या, म्हणाल्या, “महिलांच्या खोलीत…”
निवेदिता यांच्या विधानावर विशाखा सुभेदार काय म्हणाली?
विशाखाने व्हिडीओवर कमेंट करत लिहिलं, “मी मुलाखत ऐकली पहिली.. काही मुद्दे इतके पटले, आवडले की मी अर्धवट बघूनच ताईला फोनदेखील केला. पण हा मुद्दा (नाट्यगृहे खासगी ट्रस्टना देण्याचा) मी नंतर ऐकला. जो मला वाटलं तिच्याशी बोलावं पण ते राहून गेलं.. पण खरंच सांगते हे कुठेतरी पटत नाहीये.. नाट्यगृहे खासगी झाली तर.. ट्रस्टकडे जातील एखाद्या किंवा एखादी कंपनी कंत्राटी वर चालवायला घेतील मग भाडे वाढ, आधीच पेपर जाहिरात आणि ट्रान्सपोर्ट यामुळे नाटक हा खेळ खर्चाचे ताळमेळ ना होणारा आहे. अजून जर तिकीट वाढ केली तर प्रेक्षक येतील? पूर्वीचा आठवडा भर चालणार हा खेळ आता शनिवार, रविवारचा होऊन बसलाय. खासगीकरण फक्त स्वच्छता आणि व्यवस्था नीट व्हावी याकरिता हवं असेल तरी मी म्हणते फक्त सफाई आणि दुरुस्तीचं दर महिन्याला कंत्राट द्या… आपोआप अनेक गोष्टी मार्गी लागतील.”
दरम्यान, महाराष्ट्रातील नाट्यगृहांची दूरवस्था हा कायम चर्चेत राहणारा विषय आहे. आतापर्यंत अनेक कलाकारांनी नाट्यगृहांमधील अस्वच्छता व अपुऱ्या सुविधांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.