कॉमेडियन समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमध्ये केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे गेल्या काही दिवसांपासून युट्यूबर रणवीर अलाहाबादिया सर्वत्र चर्चेत आहे. शोमध्ये रणवीरने एका स्पर्धकाला पालकांच्या प्रायव्हसीबद्दल प्रश्न विचारला होता. शोमधील हा व्हिडीओ व्हायरल होताच रणवीरवर सर्व स्तरांतून टीका होऊ लागली. एवढंच नव्हे तर त्याच्याविरोधात तक्रार सुद्धा दाखल करण्यात आली.
रणवीर अलाहाबादिया, समय रैना, अपूर्वा मखीजा, आशीष चंचलानी या चार जणांची वैयक्तिक चौकशी देखील सुरू आहे. याशिवाय समय रैनाने देखील ‘इंडियाज गॉट लेटेंट’चे सर्व शो युट्यूबवरून हटवतोय असं स्पष्टीकरण देत सर्वांची माफी मागितली आहे. या संपूर्ण प्रकरणावर आता बॉलीवूडसह मराठी कलाविश्वातील कलाकार सुद्धा व्यक्त होऊ लागले आहे.
विनोदाचं अचूक टायमिंग साधत गेली कित्येक वर्षे महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणून विशाखा सुभेदारला ओळखलं जातं. तिने आजवर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’, ‘कॉमेडीची बुलेटट्रेन’, ‘फू बाई फू’ असे अनेक विनोदी कार्यक्रम केले आहेत. याशिवाय विशाखाने असंख्य चित्रपटांमध्ये विनोदी व्यक्तिरेखा देखील साकारल्या आहेत. अभिनेत्रीने सविस्तर पोस्ट शेअर करत ‘इंडियाज गॉट लेटेंट’ शो आणि रणवीर अलाहाबादिया केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत आपलं मत मांडलं आहे. प्रेक्षकांनी सुद्धा असे कार्यक्रम पाहताना विचार केला पाहिजे असंही विशाखाने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
“थोडं भान ठेवायला हवं…”, अभिनेत्री विशाखा सुभेदारची पोस्ट
वि(वेक)नोद संपला.
माणसं दारू पितात. ती प्रमाणात पितात तोपर्यंत ठीक. पण एखादा प्रमाणाबाहेर प्यायला लागला, तर आपण काय म्हणतो; तो दारूवर नाही, तर दारू त्याच्यावर स्वार झालीय. आजच्या सो कॉल्ड तरूण वर्गाचंही काहीसं असंच झालंय. सोशल मीडियाच्या तो एवढा आहारी गेला आहे, की सोशल मीडिया त्याच्यावर पूर्णतः हावी झालाय. त्यामुळे झालंय असं, की त्याने आपला विवेक गहाण ठेवलाय, हेही त्याला कळत नाही. सद्सदविवेकबुध्दी नावाची काही गोष्ट असते, हे तो पूर्ण विसरून गेला आहे. झटपट प्रसिध्दीसाठी…
सोशल मीडियाचा कसाही वापर व्हायला लागलाय. त्यातही विनोदाच्या नावाखाली काय वाट्टेल ते खपवलं जातं. त्यामुळे त्याच्या दर्जाबद्दल न बोललेलं बरं. अगदी ताजं उदाहरण म्हणजे युट्यूबवरचा ‘इंडियाज गॉट लेटेंट’ हा कार्यक्रम. विनोद निर्मितीसाठी जर एखादी नीचतम पातळी असेल, तर रणवीर अलाहाबादीया त्याच्याही पुढे गेला. समोरच्या स्पर्धकाला त्याच्या आई वडिलांच्या प्रायव्हसी संदर्भात प्रश्न विचारून विनोद करणं, हे विकृत असल्याचंच लक्षण आहे. खरंतर त्या स्पर्धकाने बाणेदारपणा दाखवून रणवीर अलाहाबादीयाच्या कानाखाली वाजवली पाहिजे होती. त्या रणवीर अलाहाबादीयापेक्षा लोकांनी त्याचं जास्त कौतुक केलं असतं.
महाराष्ट्रात दादा कोंडके, राम नगरकर, राजा गोसावी यांच्यासारखे अनेक विनोदवीर होऊन गेले. दादा कोंडके यांच्या व्दयर्थी संवादांना आणि गाण्यांना लोकांनी भरभरून दाद दिली. पण त्यांना कधी कचाट्यात पकडता आलं नाही. याला म्हणतात टॅलेंट. चि. वि. जोशी, आचार्य अत्रे, शंकर पाटील, द. मा. मिरासदार, पु. ल. देशपांडे अशा अनेक विनोदी लेखकांनी विनोदासाठी कधीच कमरेखालचा वापर केला नाही.
परकीय कार्यक्रमांचं अनुकरण करताना थोडं तरी तारतम्य बाळगायला हवं. रणवीर अलाहाबादीयालाही आईवडील असतील. बहीण असेल. याचा विचार त्याने प्रश्न विचारताना करायला हवा होता. पण काही जणांना येनकेन प्रकारेण पैसा आणि प्रसिद्धीसाठी कुठल्याही थराला जाण्याचा रोगच जडला आहे.
‘इंडियाज गॉट लेटेंट’ सारख्या कार्यक्रमावर उड्या मारणाऱ्या प्रेक्षकांनीही आपली अभिरुची तपासून बघण्याची गरज आहे.
आता स्टॅण्डअप कॉमेडी करणारे किंवा इतरही कलाकार यापुढे जबाबदारीने विनोद निर्मिती करतील अशी अपेक्षा. यापुढे तरी थोडं भान ठेवायला हवं.

दरम्यान, विशाखाच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी सुद्धा सहमती दर्शवली आहे. “अगदी वस्तुस्थितीला हात घातलात आणि तोही ओघवत्या लिखाण शैलीत.”, “आता तर फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर सुद्धा काही अश्लील विनोद करतात किंवा काही अश्लील शब्द वापरतात”, “विशाखा ताई तुमची पोस्ट नक्कीच विचार करायला लावणारी आहे.” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी अभिनेत्रीच्या पोस्टवर दिल्या आहेत.