Vishakha Subhedar : नाटक, मालिका, चित्रपट अशा तिन्ही माध्यमांत काम करून प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण करणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणून विशाखा सुभेदारला ओळखलं जातं. विनोदाचं अचूक टायमिंग साधत गेली अनेक वर्षे या अभिनेत्रीने आपलं खळखळून मनोरंजन केलं. पण, कामाव्यतिरिक्त तिने घरची जबाबदारी देखील उत्तमप्रकारे सांभाळली. काही दिवसांपूर्वीच विशाखाचा लाडका लेक शिष्यवृत्ती मिळवून परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी रवाना झाला. तिच्या लेकाचं नाव आहे अभिनय सुभेदार.

अभिनय सुभेदार काही दिवसांपूर्वीच उच्च शिक्षण घेण्यासाठी लंडनला गेला. लेकाला सोडण्यासाठी विशाखा खास विमानतळावर आली होती. यादरम्यानचे फोटो आणि व्हिडीओ तिने शेअर केले होते. आता परदेशात गेलेल्या अभिनयने पहिल्यांदाच बेसनाचे लाडू बनवले होते. लेकाचं पाककौशल्य पाहून अभिनेत्री प्रचंड भारावून गेली होती. त्यामुळे लाडक्या लेकाचं कौतुक करत विशाखाने खास पोस्ट लिहिली आहे.

हेही वाचा : “खलनायिकेचा पुरस्कार तुम्हाला मिळाला पाहिजे होता…”, नेटकऱ्याच्या प्रश्नावर काय म्हणाल्या ऐश्वर्या नारकर? उत्तर एकदा पाहाच…

विशाखा सुभेदारची पोस्ट

पोर.. अभिनय सुभेदार शिकता-शिकता स्वयंपाकही करु लागला… आणि दिवाळीत स्वतः बेसनाचे लाडू देखील केले… खूप भारी वाटतंय… फराळ वगैरे करणं माझं कधीच मागे पडलं… पुड्याला कात्री लावली की, पडला डब्यात फराळ… झाली दिवाळी..! हल्ली फराळ तर १२ महिने चालूच असतो… पण, परदेशी गेल्यावर आपलं सगळं हट्टाने हवं असतं नाही का…? सण, पदार्थ, भावंड, मित्र-मैत्रिणी, आई-बाबा… पण, ही सगळी नाती एका लाडवाच्या गोडीत असतात रे… आणि त्यात तू तो पहिल्यांदा बनवला आहेस. मग तर तो कायच्या काय उत्तम झाला असणार… माझ्या डोळ्यातल्या पाण्यामुळे थोडी खारट चव आली खरी ओठांवर पण बेसन लाडूने तोंड गोड केलं बरं… तुझं खूप कौतुक! अबुली… मी घरी नसूनही तू खूप काय-काय शिकलास, खरंतर त्याचमुळे तू किती स्वावलंबी झालास आणि आता तर अजून होतोयस… खूप शाबासकी तुला..! कायमच तुझी वाट पाहणारी, तुझ्यासाठी जगणारी तुझी आई आणि आपला बाबाही.

हेही वाचा : रिंकू राजगुरुने ‘लापता लेडीज’च्या मंजू माईला भेट दिली सुंदर साडी! दोघींनी ‘या’ चित्रपटात केलंय एकत्र काम, तुम्हाला माहितीये का?

विशाखाने ( Vishakha Subhedar ) ही पोस्ट लिहिताना डोळ्यात आनंदाश्रू तरळल्याने इमोजी दिले आहेत. याशिवाय नेटकऱ्यांनी देखील या पोस्टवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. “मुलावर खूप छान संस्कार केले आहेत त्याचं हे फळ आहे”, “आमच्यासाठी ५ लाडू बाजूला काढायला सांगा”, “किती छान” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या पोस्टवर केल्या आहेत.