कलाकारांचं खासगी आयुष्य जाणून घेण्यात त्यांच्या चाहत्यांना अधिक रस असतो. या मंडळींचं अफेअर, नातं, लग्न सगळं काही चर्चेचा विषय ठरतं. असंच काहीसं अभिनेता विवियन डिसेनाच्याबाबतीतही घडलं. ‘मधुबाला’, ‘शक्ति: अस्तित्व के एहसास की’ सारख्या कार्यक्रमांमधून विवियन नावारुपाला आला. सध्या तो कलाक्षेत्रापासून दूर आहे. मात्र त्याचं वैवाहिक आयुष्य चर्चेचा विषय ठरत आहे. वर्षभरापूर्वी गपचूप लग्न केल्यानंतर विवियन आता काही खुलासे केले आहेत.
वर्षभरापूर्वी विवियनने नूरन अलीशी लग्नगाठ बांधली. त्याला एक लहान मुलगीही आहे. याचबाबत विवियनने भाष्य केलं आहे. ‘बॉम्बे टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये तो म्हणाला, “हो मी लग्न केलं आहे आणि मला चार महिन्यांची मुलगीही आहे. यामध्ये कोणती मोठी गोष्ट नाही. योग्य वेळ येईल तेव्हाच मी मुलगी आणि लग्नाबाबत सांगेन असं ठरवलं होतं. वर्षभरापूर्वी मी आणि नूरनने इजिप्तमध्ये लग्न केलं”.
“वडील होणं हे माझ्यासाठी एक स्वप्न पूर्ण होण्यासारखंच आहे. जेव्हा मी माझ्या मुलीला उचलून घेतो तेव्हा मी सर्वाधिक खूश असतो”. विवियनने त्याच्या मुलीचं नाव लेन ठेवलं आहे. त्याला त्याच्या कुटुंबियांना प्रसिद्धीपासून दूर ठेवायचं आहे. म्हणूनच त्याने त्याचं लग्नही सिक्रेटच ठेवलं. त्याची पत्नी नूरनलाही झगमगत्या दुनियेपासून दूर राहणंच आवडतं.
२०१९पासून इस्लाम धर्म फॉलो करत असल्याचंही यावेळी विवियनने सांगितलं. विवियनने २०१३मध्ये सुप्रसिद्ध अभिनेत्री वाहबिज दोराबजीबरोबर लग्न केलं होतं. सात वर्षांच्या सुखी संसारानंतर २०२१मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. आता विवियन त्याच्या आयुष्यामध्ये खूप पुढे गेला आहे. दुसरं लग्न करत तो आता खूश आहे.