देशाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात उपस्थिती लावली. या कार्यक्रमात त्यांनी दिलखुलास गप्पा मारल्या आणि अवधूत गुप्तेंच्या प्रश्नांना तेवढीच दिलखुलास पणे उत्तरं दिली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यातली खुपणारी गोष्ट काय हे सांगितलं आहे. त्यांनी दिलेली ही उत्तरं चर्चेत आहेत.
काय म्हणाले आहेत गडकरी मोदी आणि अमित शाह यांच्याविषयी?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी खुपणारी गोष्ट म्हणजे, ते स्वतः खूप काम करतात, परिश्रम करतात आणि सगळ्यांना काम करायला लावतात. त्यात लोक थकून जातात असं गडकरींनी म्हटलं आहे.
अमित शाह यांच्यातलं काय खुपतं?
अमित शाह हे कायम गंभीर असतात. टेन्शनमध्ये असल्यासारखे वाटतात असं म्हणत त्यांच्यातली खुपणारी गोष्ट काय आहे ते नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे. खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात मॅजिक बॉक्स नावाचा एक सेगमेंट आहे त्यात एक एक फोटो समोर येतो आणि त्यातली खुपणारी गोष्ट सांगायची असते. या दोघांचे फोटो समोर आल्यावर नितीन गडकरी यांनी त्यांच्याविषयी ही दोन उत्तरं दिली आहेत. तर दुसरीकडे शरद पवार यांचा फोटो आला तेव्हा शरद पवार हे स्पष्ट कधीच बोलत नाहीत ते आपल्याला खुपतं असं नितीन गडकरींनी म्हटलं आहे.
आणखी काय म्हटलं आहे नितीन गडकरींनी?
महाराष्ट्राची राजकीय परंपरा देशातल्या राजकारणापेक्षा वेगळी आहे. वैचारिक मतभेद असतील पण मनभेद नव्हते. मी पण १८ वर्षे विधीमंडळात होतो. कठोर टीका करायचो आम्ही पण व्यक्तिगत मैत्री होती. आता थोडं जास्त झाल्यासारखं वाटतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्वसामान्य माणसाला कंटाळा आला आहे. त्याचा रस या राजकारणात नाही, तुम्ही काय काम करता त्यात आहे असं नितीन गडकरींनी म्हटलं आहे.
माझ्या एका मित्राने मला खूप चांगली गोष्ट सांगितली होती. तो मला म्हणाला होता राजकारण हा ईर्ष्या, मत्सर, द्वेष, अहंकार, अभिनिवेष यांचा खेळ आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे दोन रेषा आहेत, एक तुमची आहे आणि एक दुसऱ्याची आहे. आता तुमच्याकडे दोन मार्ग आहे एक म्हणजे दुसऱ्याची रेषा पुसण्याचा प्रयत्न करणं किंवा आपली रेषा मोठी करणं. आपण नेहमी आपली रेषा मोठी करायला पाहिजे, दुसऱ्याची पुसायला जाऊ नये असाही सल्ला नितीन गडकरींनी दिला.