‘झी मराठी’ वाहिनीवर काही महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अल्पावधीत ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राने मग ते अक्षरा असो, अधिपती असो किंवा भुवनेश्वरी यांनी प्रेक्षकांच्या मनात एक अटळ स्थान निर्माण केलं आहे. मालिकेतील नवनवीन ट्वीस्टमुळे प्रेक्षकांना चांगलंच खिळवून ठेवलं आहे. लवकरच आता अक्षरा-अधिपतीच्या लग्नानंतरची पहिली दिवाळी पाहायला मिळणार आहे. या पहिल्या दिवाळीत काय-काय घडणार? जाणून घ्या…
हेही वाचा – ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीने घेतली आलिशान गाडी; फोटो शेअर करत म्हणाली, “यंदाची दिवाळी…”
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत दिवाळी सण साजरा करण्याची लगबग सुरू आहे. अक्षरा-अधिपतीची लग्नानंतरची ही पहिली दिवाळी आहे. त्यामुळे अक्षरा ही दिवाळी खास करण्याकरिता स्वतःच्या हाताने आकाश कंदील तयार करते. मास्तरीणबाईने केलेला हा आकाश कंदील पाहून अधिपती पुन्हा तिच्या प्रेमात पडतो. अधिपती तो आकाश कंदील कौतुकाने घरासमोर लावतो. पण भुवनेश्वरीला ते खटकत. अक्षराने केलेला आकाश कंदील पाहते आणि अधिपतीकडे हट्ट धरते की, तिने आणलेला आणि सूर्यवंशींच्या श्रीमंतीला शोभेल असाच कंदील घरासमोर लागला पाहिजे. त्यामुळे आता अधिपती, आईचा हट्ट पुरवणार की बायकोचं मन सांभाळणार? हे येत्या काळात समजेल.
हेही वाचा – ‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीच्या घरी आला नवा सदस्य; व्हिडीओ शेअर करून दिली आनंदाची बातमी
अधिपती अक्षराला पाडव्याला काय भेट देणार?
दरम्यान, नव्या जोडप्याला लग्नानंतरच्या पहिल्या दिवाळीची जितकी उत्सुकता असते तितकीच आवर्जून प्रतिक्षा असते दिवाळीतल्या पाडव्याची. अक्षराचा लग्नानंतरचा हा पहिलाच पाडवा आहे. त्यामुळे मास्तरीणबाईंना अधिपती एक खास भेट देणार आहे. ज्यामुळे अक्षराचा चेहरा आनंदानी फुलून जाणार आहे. पण या खास भेटीबद्दल जेव्हा भुवनेश्वरीला कळेल तेव्हा काय होईल? हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे.