प्रेमाला वयाचं बंधन नसतं असं म्हणतात. असंच एका सेलिब्रिटी जोडप्याबरोबर घडलं होतं. एकाच मालिकेत काम करताना दोघे प्रेमात पडले. विशेष म्हणजे त्या मालिकेत या जोडप्याने सासू व जावई या भूमिका केल्या होत्या. दोघांच्या वयात अंतर होतं, पण तरीही या जोडप्याने लग्न करायचं ठरवलं. मात्र या जोडप्याला प्रचंड टीकेचा सामना करावा लागला.
या सेलिब्रिटी जोडप्याने नुकताच त्यांच्या लग्नाचा २० वा वाढदिवस साजरा केला. प्रेम असेल तर टीका, समस्या, आव्हानं यांच्यावर मात करत लोक एकत्र आनंदाने संसार करू शकतात, याचंच उदाहरण हे दोघे आहेत. त्यांच्या अॅनिव्हर्सरीच्या सेलिब्रेशनचे फोटो समोर आल्यावर या दोघांच्या लव्हस्टोरीची पुन्हा एकदा चर्चा होत आहे.
‘चक्रवगम’ नावाची एक लोकप्रिय तेलुगू मालिका होती. यामध्ये खऱ्या आयुष्यातील जोडपे इंद्रनील व मेघना यांच्या खास भूमिका होत्या. ही मालिका २००३ मध्ये सुरू झाली होती आणि बराच काळ प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. या मालिकेत मेघना रामीने इंद्रनीलच्या सासूची भूमिका साकारली होती.
इंद्रनील-मेघनाच्या ‘चक्रवगम’ या शोचे १००० हून अधिक भाग प्रसारित झाले. या शोचा टीआरपी देखील खूप जास्त होता. हा शो करोना काळात पुन्हा प्रसारित करण्यात आला होता, तेव्हा त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. या शोमध्ये सासू-जावयाच्या भूमिकेत असलेल्या मेघना व इंद्रनील यांनी नंतर लग्न करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. ही मालिका पुन्हा प्रसारित करण्यात आली तेव्हा हे दोघे पती पत्नी होते.
इंद्रनील व मेघना रामी यांच्या नात्यात खूप चढउतार आले. दोघांना लग्न करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. इंद्रनीलबरोबरच्या नात्यामुळे मेघनाला खूप टीकेचा सामना करावा लागला. तिला शरीरयष्टीवरून ट्रोल करण्यात आलं, यामुळे ती तणावात होती. पण या काळात तिला पतीने खंबीर साथ दिली, पतीमुळे या सगळ्या आव्हानांचा हिंमत न हारता सामना करू शकली, असं मेघना सांगते.
मेघनाचा पती इंद्रनील तिच्यापेक्षा वयाने लहान दिसतो, त्यामुळेही तिला ट्रोल केलं जातं. अभिनेत्रीने एकदा सांगितलं होतं की मुली त्याला मेसेज करून म्हणायच्या की तो खूप देखणा आहे. बऱ्याच वेळा लोक विचारतात की तो माझा मुलगा आहे का? लोक सोशल मीडियावर अशा कमेंट्स करून खिल्ली उडवायचे, असं मेघनाने म्हटलं होतं.
इंद्रनील व मेघना यांना बाळ नाही आणि त्यांना आई-वडिलांची जबाबदारीही नको आहे, कारण त्यांचं वय झालं आहे. त्यामुळे मुलं झाल्यास त्यांचा सांभाळ कोण करेल, अशी काळजी या दोघांना वाटते.