केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचे मोठे चाहते आहेत. एकदा बिग बींनी नितीन गडकरींना फोन करून त्यांचं कौतुक केलं होतं. पहिल्यांदा फोन उलल्यावर नितीन गडकरींना वाटलं की कुणीतरी त्यांची मस्करी करत आहे, त्यामुळे त्यांनी फोन ठेवायला सांगितला होता. नंतर दुसऱ्यांदा फोन आला आणि त्यांचं काय संभाषण झालं, ते जाणून घेऊयात.
“अमिताभ बच्चन माझे आवडते अभिनेते आहेत. मी महाराष्ट्रात असताना एकदा त्यांचा मला फोन आला. ते म्हणाले ‘मी अमिताभ बोलतोय’, मी म्हटलं, ‘नाटक नको करूस फोन ठेव’. मला वाटलं कोणीतरी माझी मस्करी करतंय. माझा त्यांचा परिचय नव्हता, थोड्या वेळाने पुन्हा फोन वाजला. ते म्हणाले ‘नितीनजी मी खरंच अमिताभ बच्चन बोलतोय’. मी त्यांना सॉरी म्हटलं”, असं नितीन गडकरींनी सांगितलं.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची ऑफर का नाकारली होती? नितीन गडकरी खुलासा करत म्हणाले, “मी तेव्हा…”
अमिताभ बच्चन यांच्याशी झालेला संवाद त्यांनी ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात सांगितला. “दुसऱ्यांदा फोन आल्यावर तुम्ही का फोन केला असं मी त्यांना विचारलं. ते म्हणाले, ‘मी मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरून आलोय, रस्ता खूप सुंदर बांधलाय, मला खूप आनंद झाला.’ मग मी त्यांना म्हणालो, ‘अमिताभजी तुम्ही मला फार आवडता. मी थर्ड क्लासमध्ये बसून तुमचे चित्रपट पाहिलेत, दिवार मी तीन वेळा पाहिलाय. तुमची फायटिंग मला फार आवडते’. त्यांनी मला थांबवले, ते म्हणाले ‘नितीनजी चित्रपटांची गोष्ट सोडा, एक चित्रपट चांगला चालला तर लोक त्याला वर्षभर लक्षात ठेवतात आणि गाणी चांगली असतील तर दोन वर्ष लक्षात ठेवतील. पण आम्ही मुंबईकर तुम्हाला आयुष्यभर विसरू शकत नाही, कारण रोज तुम्ही बांधलेल्या फ्लायओव्हरवरून आम्ही रोज जातो. त्यामुळे आमचा वेळ वाचतो, ट्रॅफिकपासून मुक्ती मिळते. आम्ही तुम्हाला १०० वर्षे विसरू शकत नाही.'”