टीव्ही मालिका व चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारे ऋतुराज सिंह यांची हृदय बंद पडल्यामुळे (कार्डिअॅक अरेस्ट) प्राणज्योत मालवली. ते ५९ वर्षांचे होते. सोमवारी रात्री त्यांचे निधन झाल्याचे समोर आले असून साऱ्या मनोरंजनसृष्टीवर यामुळे शोककळा पसरली आहे. बॉलिवूडमधील बऱ्याच लोकांनी याबद्दल सोशल मीडियावर शोक व्यक्त केला आहे. ऋतुराज सिंह यांना मुंबईत आणण्यात बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा फार मोठा वाटा होता हे फारसं कुणाला ठाऊक नसेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऋतुराज सिंह यांना मुंबईत अभिनयासाठी घेऊन येण्यात शाहरुख खानचा मोठा वाटा होता, इतकंच नव्हे तर शाहरुख कधीही ऋतुराज सिंह यांची ओळख करून देताना त्याचा जुना खास मित्र अशी ओळख करून द्यायचा. स्टार झाल्यावरही कधीच शाहरुखने आपल्या मित्रांपासून अंतर ठेवलं नाही. उलट शाहरुख बऱ्याचदा ऋतुराज यांना आपल्या व्हॅनीटी वॅनमध्ये बोलवायचा अन् दोघे मिळून एकत्र सिगारेट ओढायचे. या सगळ्या गोष्टींचा खुलासा खुद्द ऋतुराज सिंह यांनीच केला होता.

आणखी वाचा : डॉन युनिव्हर्समध्ये झाली ‘या’ अभिनेत्रीची एन्ट्री; ‘डॉन ३’मध्ये प्रथमच रणवीर सिंगसह करणार स्क्रीन शेअर

दिल्लीमध्ये बेरी जॉन यांच्या नाटकाच्या ग्रुपमध्ये या दोघांची ओळख झाली. या अॅक्टिंग क्लासपासूनच त्यांनी त्यांचा प्रवास सुरू केला होता. याच आठवणींबद्दल ऋतुराज यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये शाहरुखबरोबरच्या मैत्रीविषयी भाष्य केलं होतं. त्या मुलाखतीमध्ये ऋतुराज म्हणाले, “त्यावेळी बेरी जॉनकडे अभिनय शिकताना आम्ही आयुष्यातील बऱ्याच गोष्टींवर चर्चा करायचो. आम्ही एकत्रच सराव करायचो, फुटबॉल खेळायचो. आम्हा दोघांची अंगकाठीही एकसारखीच असल्याने आम्हाला एकमेकांचे कपडेदेखील होत असत. तो काळ माझ्या आयुष्यातील सुवर्णकाळ होता. मी शाहरुखच्याच आग्रहाखातर मुंबईत काम शोधायला आलो.”

पुढे ऋतुराज सिंह म्हणाले, “शाहरुख जेव्हा जेव्हा मला भेटायचा तेव्हा मला म्हणायचा, की तू दिल्लीत काय करतोयस? तू इतका उमदा कलाकार आहेस, तुला मुंबईत यायला पाहिजे.” अखेर ऋतुराज यांनी शाहरुखचं ऐकलं आणि मुंबईत येऊन त्यांनी टेलिव्हिजन क्षेत्रात स्वतःचं असं वेगळं स्थान निर्माण केलं. शाहरुखने मोठ्या पडद्यावर एन्ट्री घेत बॉलिवूड गाजवलं तर ऋतुराज यांनी ‘अपनी बात’, ‘ज्योती’, ‘हिटलर दीदी’, ‘शपथ’, ‘वॉरियर हाय’, ‘आहट’, ‘अदालत’, ‘दिया और बाती’ अशा वेगवेगळ्या मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात घर केलं.

ऋतुराज सिंह हे रुपाली गांगुलीसह लोकप्रिय हिंदी मालिका ‘अनुपमा’मध्येदेखील झळकले. ही मालिका चांगलीच चर्चेत होती. याशिवाय त्यांनी ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’, ‘सत्यमेव जयते २’, ‘जर्सी’, घोस्ट’ अशा चित्रपटातही काम केलं होतं. जानेवारीत प्रदर्शित झालेल्या रोहित शेट्टीच्या ‘इंडियन पोलीस फोर्स’मध्ये ऋतुराज यांनी रफीक ही भूमिका साकारली होती.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When rituraj singh said he became actor on shahrukh khans insistence avn